Thyroid Pudhari
पुणे

Subclinical Thyroid Disorder: सब-क्लिनिकल थायरॉइड विकार वाढता धोका; सामान्य रिपोर्ट असूनही लक्षणे का?

तज्ज्ञांचा इशारा—थायरॉइड तपासणी सामान्य आली तरी शरीरात बिघाड सुरू असू शकतो

पुढारी वृत्तसेवा

पुणे: थकवा, वजन वाढणे, केस गळणे, मूड बदलणे, बद्धकोष्ठता, एकाग््राता कमी होणे आणि मासिक पाळीतील अनियमितता, यांसारखी लक्षणे अनेकांना जाणवत असतात. मात्र, थायरॉइडची तपासणी केल्यानंतर टी 3, टी 4 आणि टीएसएच रिपोर्ट नॉर्मल आल्याने रुग्ण संभमात पडतात. जागतिक थायरॉइड दिनानिमित्त तज्ज्ञांनी सब-क्लिनिकल थायरॉइड विकार हे वाढते आरोग्य आव्हान असल्याचा इशारा दिला आहे.

रुबी हॉल क्लिनिक येथील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. पीयूष लोढा यांनी सांगितले की, अनेक रुग्णांमध्ये हार्मोन्सची पातळी प्रयोगशाळेच्या मर्यादेत असली तरी शरीरात थायरॉइड कार्य बिघडण्याची सुरुवात झालेली असू शकते. या अवस्थेला सब-क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हटले जाते. थायरॉइडचे आरोग्य केवळ रक्ततपासणीवर अवलंबून नसते. ताणतणाव, अपुरी झोप, लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, आयर्न आणि सेलेनियम यांसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता यांचाही शरीरावर परिणाम होतो. विशेषतः महिलांमध्ये गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्तीच्या काळात होणारे हार्मोनल बदल थायरॉइडसारखी लक्षणे निर्माण करू शकतात.

वैद्यकीय उपाययोजना:

  • नियमित तपासणी: टीएसएच, टी 3, टी 4 दर 6 ते 12 महिन्यांनी तपासणे. कुटुंबात थायरॉइडचा इतिहास असल्यास अधिक लक्ष.

  • लवकर निदान: महिला, गर्भवती आणि 30 वर्षांवरील व्यक्तींमध्ये स्क्रीनिंग वाढविणे. मधुमेह, स्थूलता असलेल्या रुग्णांची विशेष तपासणी.

  • औषधोपचार: टीएसएचवाढल्यास डॉक्टर कमी डोसचे थायरॉइड हार्मोन औषध सुरू करतात. सर्व रुग्णांना औषध आवश्यक असतेच, असे नाही.

  • गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी: सब-क्लिनिकल हायपोथायरॉइडिझममुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान नियमित थायरॉइड मॉनिटरिंग आवश्यक.

जीवनशैलीतील उपाय

  • आयोडिनयुक्त मिठाचा योग्य वापर

  • संतुलित आहार

  • नियमित व्यायाम

  • विनाकारण सप्लिमेंट्‌‍स किंवा हार्मोन औषधे टाळणे

  • ताणतणाव कमी करणे

  • पुरेशी झोप

प्रयोगशाळेतील सामान्य निकष प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श असतीलच, असे नाही. त्यामुळे केवळ रिपोर्टवर आधारित उपचार न करता रुग्णाची लक्षणे, कौटुंबिक इतिहास आणि एकूण आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे.
डॉ. पीयूष लोढा, एंडोक्रिनोलॉजिस्ट
भारतात थायरॉइड विकारांचे निदान अनेकदा उशिरा होते. ग््राामीण आणि निमशहरी भागांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. सततचा ताण, प्रोसेस्ड फूड, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव, यामुळेही थायरॉइड विकारांचे प्रमाण वाढत आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि वेळेवर तपासणी, यामुळे थायरॉइड विकारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
डॉ. अस्मिता साळुंखे, स्त्रीरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT