पुणे

Pune Rain News : अर्ध्या तासात रस्त्यांना पूर; धो धो पावसाने पुणेकरांची दाणादाण; पादचारी, वाहनचालकांची तारांबळ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी सायंकाळी सात ते साडेसात या अवघ्या अर्ध्या तासात पावसाने दाणादाण उडवून दिली. शहरातील सर्वच रस्त्यांना जणू पूर आला होता. पावसाचा जोर इतका होता की, काही काळ वाहतूक थांबली होती. शहरातील काही भागात दुकानांत घरात पाणी शिरले; मात्र काही वेळात पाऊस थांबल्याने ते लगेच ओसरण्यास सुरुवात झाली होती. शहरात कात्रज भागात सर्वाधिक 12.4 मी.मी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

शहरात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरूच असून गेल्या चोवीस तासांत 27 मी.मी पावसाची नोंद झाली. बाप्पांच्या मिरवणुकीवर जलधारा बरसल्यावर पाऊस कमी झाला असे वाटत असताना शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास आकाश काळ्याभोर ढगांनी दाटून आले. त्यानंतर धो धो पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, शहरातील सर्वपेठा, उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पर्वतीपासून निलायम टॉकीजच्या परिसरात वाहनचालक खोळंबले होते, त्या भागात गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची धावपळ झाली.

दगडूशेठ मंदिर परिसर, शिवाजी रस्ता, रास्ता पेठ, सेव्हन लव्हज् चौक, स्वारगेट हा परिसर पाण्याने वेढला गेला. सायंकाळी 7 वाजता सुरू झालेला पाऊस 7.30 पर्यंत बरसतच होता. या पावसाने अर्ध्या तासातच सर्वच रस्ते जलमय करून टाकले. शहराच्या विविध भागात पाऊस कमी-अधिक वेगाने सुरू होता.

तीन दिवस राहणार पावसाचा जोर

कोकण व गोवा भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्या भागात पाऊस वाढणार आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहणार असल्याने आगामी तीन दिवस शहरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.

रात्री पुन्हा मुसळधार

शहरात रात्री 8 पर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतर सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली. मात्र, रात्री 10.30 वाजता पावसाला सुरुवात झाली. 10.45 वाजता मुसळधार पावसाने रस्ते चिंब भिजले. उशिरापर्यंत एकाच वेगाने पाऊस पडत होता.

कुठे किती बरसला?(मि.मी.)

शिवाजीनगर : 6.2
खडकवासला : 11.2
चिंचवड : 4.6
लवळे : 2.5
खडकी : 4.4
कात्रज :12.4
कोथरूड : 10

हेही वाचा

SCROLL FOR NEXT