Stray dog attack Pudhari
पुणे

Stray Dog Attack Safety Guide: भटका कुत्रा अंगावर धावून आल्यास काय कराल?

मुलांवर आणि ज्येष्ठांवर वाढते हल्ले; श्वान चावल्यास तात्काळ काय करावे? रेबिजपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना आणि महापालिकेची जनजागृती मोहिम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, काही भागांत श्वानांच्या टोळ्या वाहनचालकांवरही धावून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. श्वान अंगावर धावून आल्यास काय खबरदारी घ्यावी? काय करावे आणि काय नाही? याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, उघड्यावर टाकलेले अन्न आणि वाढत्या वसाहती, यामुळे भटक्या श्वानांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी श्वानांच्या टोळ्या दुचाकीस्वारांवर धावून जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. सकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारी मुले आणि रात्री उशिरा घरी परतणारे नागरिक यांच्यावर प्रामुख्याने श्वान हल्ले करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा परिस्थितीत श्वान अंगावर धावून आल्यास घाबरून पळू नये, असे तज्ज्ञ सांगतात.

नेमके काय करावे..?

  • घाबरून पळू नका. पळाल्यास श्वान अधिक आक्रमक होतो.

  • स्थिर उभे राहा. हात खाली ठेवून शांत उभे राहा.

  • डोळ्यांत डोळे रोखून पाहू नका. हे आव्हान मानले जाऊ शकते.

  • हळूहळू मागे सरका. पाठ फिरवू नका; हळूच लांब जा.

  • जवळ वस्तू असेल तर ढाल म्हणून वापरा. उदा. : बॅग, पाण्याची बाटली किंवा छत्री पुढे धरता येईल.

  • शांत; पण ठाम आवाजात ‌‘जा‌’ किंवा ‌‘हट‌’ म्हणा. ओरडू नका; पण ठामपणे बोला.

काय करू नये?

  • दगड मारणे किंवा उचकावणे टाळा.

  • काठीने हाणण्याचा प्रयत्न करू नका.

  • लहान मुलांना एकटे सोडू नका.

  • श्वान झोपलेला असताना किंवा खात असताना जवळ जाऊ नका.

लहान मुलांसाठी विशेष सूचना

  • मुलांना श्वान दिसल्यास शांत राहण्याचे प्रशिक्षण द्या.

  • शाळेत जाण्या-येण्यासाठी शक्यतो समूहाने पाठवा.

  • लहान मुलांना अन्न हातात घेऊन रस्त्यावर चालू देऊ नका.

  • ज्या रस्त्यावर श्वान आहेत अशा ठिकाणी मुलांना एकटे सोडू नका.

ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • सकाळी किंवा रात्री निर्जन रस्ते टाळावेत.

  • चालताना हातात काठी ठेवल्यास अंतर राखण्यास मदत होते.

  • मोबाईलमध्ये आपत्कालीन क्रमांक सेव्ह ठेवा.

रेबिज हा जीवघेणाआजार असल्याने उपचारात विलंब करणे धोकादायक ठरू शकते अश्मयुगापासून मानव आणि श्वान यांचे सहअस्तित्व राहिले आहे. मानवाचा तो प्रामाणिक मित्र आहे. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढल्याने किंवा काही मानवी चुकांमुळे श्वान आक्रमक होत आहेत. यामुळे लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. हे हल्ले रोखायचे असल्यास त्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. प्राण्यांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षण मुलांना शालेय जीवनापासून द्यायला हवे. महापालिकेने श्वानांचे निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रियांची संख्या देखील वाढवायला हवी.
डॉ. कपिल जयकर, पशुवैद्यकीय तज्ज्ञ
श्वानांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या व खासगी शाळेमध्ये जनजागृती केली जात आहे. 52 शाळांमधील तब्बल 12 हजार 994 मुलांना व 479 शिक्षकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात आहे.
डॉ. सारिका फुंदे-भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

श्वान चावल्यास तत्काळ काय करावे?

  • जखम त्वरित साबण आणि वाहत्या पाण्याने 10-15 मिनिटे स्वच्छ धुवा.

  • जखमेवर अँटिसेप्टिक लावावे.

  • शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात जा.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबिज प्रतिबंधक लस घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT