पुणे

‘पीएमपी’त दमछाक ! पुण्यात ‘पीक अवर’ला तुफान गर्दी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रवासी संख्या जास्त असून, त्या तुलनेत बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शहरात 'पीक अवर'ला पीएमपी बसमध्ये अक्षरश: पाय ठेवायलाही जागा राहत नाही. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक मोठी कसरत करत बसमध्ये चढतात. पाठीवर दफ्तराचे ओझे आणि त्यात गर्दी. बसायला जागा मिळणे तर दूरच. इंच इंच पुढे सरकण्यासाठी झगडावे लागते. अक्षरश: दाटीवाटीतून प्रवास करावा लागतो…

पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपी सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. बहुतांश नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व महिलावर्ग पीएमपी बसने प्रवास करतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी स्वारगेट, शिवाजीनगर, महापालिका, पुणे रेल्वेस्थानक, हडपसर यासह अनेक ठिकाणच्या पीएमपी बसस्थानकांवर गर्दीचा महापूर आलेला असतो. तुडुंब बसमध्ये भरलेल्या बसमध्ये कसेबसे उभे राहावे लागते. यावेळी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळी शाळेसाठी बाहेर पडलेली मुले सुखरूप घरी पोहचतील का ? याची चिंता पालकांना वाटत राहते.

प्रशासनाचे अपयश

एमपीच्या ताफ्यात सुमारे 2 हजार 181 बसगाड्या आहेत. यापैकी दररोज 1600 ते 1700 गाड्या दररोज शहरासह
पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए भागातील मार्गावर असतात. मात्र, शहरात प्रवाशांना सेवा पुरवत असलेल्या बस गाड्या अपुर्‍या पडतात. पुरेशा बस रस्त्यावर आणण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही

सध्या पीएमपी प्रशासनाकडे बसचा तुटवडा आहे. त्यात काही बस पीएमआरडीए, ग्रामीण भागात सोडल्या जातात. त्यामुळे शहरात वाहतूक फेर्‍यांसाठी बसची संख्या कमी पडते. परिणामी, पीएमपीच्या कात्रज, स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर,टिळक रस्ता, हडपसर, महापालिका, वाघोलीसह अनेक ठिकाणच्या थांब्यांवर प्रवासी मोठ्या संख्येने थांबलेले असतात. या ठिकाणी थांबा असलेल्या बहुतांश बस आधीच्या थांब्यांवरूनच तुडूंब भरून येतात. त्यामुळे त्या सुसाट पुढे निघून जातात. परिणामी, प्रवाशांना अन्य बसची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

आकडे काय सांगतात

पीएमपीचे रोजचे प्रवासी : 12 लाख 57 हजार 496
मासिक प्रवासी संख्या : 3 कोटी 74 लाख 27 हजार 633
वार्षिक प्रवासी संख्या : 40 कोटी 06 लाख 80 हजार 195
नियोजित मार्ग : 378
संचलनातील मार्ग : 378
पीएमपीकडील बससंख्या : 2 हजार 181
मार्गावरील बस : 1 हजार 662

दररोज सकाळी शाळेत जावे लागते. वेळेत बस मिळत नाहीत. बस आल्या तरी फुल्ल भरलेल्या असतात. त्यामुळे अधिकार्‍यांनी आमच्या शाळांच्या वेळेत गाड्या वाढवाव्यात.

– जयेश खोपडे, विद्यार्थी

बसगाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे, त्यामुळे आम्ही नव्या गाड्या घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी जास्तीत जास्त गाड्या मार्गावर उतरवणार आहे.

– सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT