चाकूच्या धाकाने रोकड लुटणारा जेरबंद; शोरूममधील स्टोअरकीपरचे कृत्य  File Photo
पुणे

Pune Robbery: चाकूच्या धाकाने रोकड लुटणारा जेरबंद; शोरूममधील स्टोअरकीपरचे कृत्य

चोरी केल्यानंतरही कामावर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाकडेवाडी येथील एका नामांकित दुचाकीच्या शोरूममधील सुरक्षारक्षकाला कटरचा धाक दाखवून, त्याचे हातपाय बांधून शोरूममधील 7 लाख 11 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरणार्‍याला गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने पकडले. प्रतीक भारत सावंत (वय 23, रा. सुळे पीजी महर्षीनगर, गुलटेकडी) असे या चोरट्याचे नाव आहे.

विशेष म्हणजे प्रतीक हा याच शोरूममध्ये स्टोअरकीपर म्हणून काम करतो. त्यानेच सुरक्षारक्षकाला धाक दाखवून पैसे चोरून नेले होते. दरम्यान, आपला हा रोकड चोरीचा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून, दोन दिवस तो कामावर आला होता. त्यानंतर त्याने चार दिवस सुटी घेतली होती. याबाबत शोरूमच्या जनरल मॅनेजर यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)

वाकडेवाडी येथील या नामांकित शोरूममध्ये राजू खान सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून, ते तेथेच राहतात. 19 ऑगस्ट रोजी पहाटे पावणेतीन वाजता एकाने त्यांना कटरचा धाक दाखवून शोरूममध्ये नेले. त्यांचे हात बांधले. कॅश काऊंटरच्या रुमची चावी घेऊन रुम उघडली. वर ठेवलेल्या कपाटातील चावी घेऊन टेबलचा ड्रॉव्हर उघडून त्यातील 7 लाख 11 हजार रुपये घेऊन तो निघून गेला होता.

जबरी चोरीचा हा प्रकार पाहता पोलिसांना संशय आला की, चोरटा कोणीतरी माहितीतील असला पाहिजे. त्यादृष्टीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाचा आणि गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा शोध गुन्हे शाखा युनिट चारचे पथक करत होते. त्या वेळी पोलिसांना ही चोरी शोरूमध्ये काम करणार्‍या एका कामगाराने केली आहे, अशी माहिती मिळाली.

शोरूममधून प्रतीक सावंत याचा फोटो मिळवून शोध सुरू होता. तेव्हा महर्षीनगर येथील गणपती मंदिराजवळ एका दुचाकी मोटार सायकलवर बसलेला तो दिसून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडील 50 हजार रुपयांची मोटार सायकल जप्त केली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांनी यांनी सांगितले की, प्रतीक सावंत हा शोरूममध्ये स्टोअरकिपर म्हणून काम करतो. त्याला कर्ज झाले होते. शोरूममध्ये पैसे असतात, त्याची त्याला माहिती होती. कर्ज फेडण्यासाठी त्याने ही चोरी केली. चोरी केल्यानंतर संशय येऊ नये, म्हणून तो दोन दिवस कामाला आला होता. त्यानंतर त्याने 4 दिवस सुटी घेतली होती.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम, पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलिस फौजदार हरीश मोरे, एकनाथ जोशी, पोलिस अंमलदार अमजद शेख, तुषार खराडे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, जहांगीर पठाण, वैभव रणपिसे, शरद झांजरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT