पुणे: उन्हाळ्यात मुलांमध्ये जठर व आतड्यांचा संसर्ग वाढत असून, वेळीच निदान, योग्य काळजी आणि समतोल आहाराने मुलांना बरे होण्यास आणि निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळाच्या दिवसांत वाढती उष्णता, निर्जलीकरण आणि दूषित अन्न तसेच पाण्यामुळे जठर व आतड्यांसंबंधी संसर्ग वाढतो. पालकांनी सतर्क राहून मुलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रतिबंधात्मक पाऊल उचलले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
रोटाव्हायरस किंवा नोरोव्हायरससारख्या विषाणूंमुळे होणारा व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा पोटाचा फ्लू, दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होणारा साल्मोनेला, ई. कोलाई आणि शिगेला सारखे बॅक्टेरियाचे संक्रमण आणि अस्वच्छतेमुळे किंवा अशुद्ध पाणी प्यायल्याने होणारे जिआर्डियासिस आणि अमीबियासिससारखे परजीवी संसर्ग उन्हाळ्याच्या दिवसात मुलांमध्ये आढळून येतात. (Latest Pune News)
दूषित अन्न आणि पाण्याचे सेवन ही याची प्रमुख कारणे आहेत. कारण, बरेच जण रस्त्याच्या कडेला उपलब्ध असलेल्या उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करतात. यामुळे जठर व आतड्यांची समस्या उद्भवू शकते. हातांची स्वच्छता न राखणे आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर किंवा जेवणापूर्वी हात न धुणे, न धुतलेली फळे आणि भाज्या खाणे, उष्णतेमुळे होणारे निर्जलीकरण यामुळे जठर व आतड्यांचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
काय आहेत लक्षणे
मळमळ आणि उलट्या
पोटात कळ येणे
जुलाब किंवा अतिसार
ताप येणे
भूक न लागणे
थकवा किंवा अशक्तपणा
तोंड कोरडे पडणे, लघवीचे
प्रमाण कमी होणे किंवा डोळे खोल जाणे, यांसारखी निर्जलीकरणाची लक्षणे दिसून येतात.
वाढत्या गॅस्ट्रोएन्टेरिटिसच्या प्रकरणांमध्ये ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन्स आवश्यक आहेत. तापासाठी अँटीपायरेटिक्स, अँटीबायोटिक्स किंवा अँटीपॅरासायटिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. यामध्ये मुलांना पुरेशी झोप मिळेल, याची पालकांनी खात्री करावी.मुलांना जंक फुड, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ देणे टाळावे. उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन टाळा. मुलांना लिंबू पाणी, ताक किंवा नारळ पाणी प्यायला द्या, जेणेकरून त्यांना हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. मुलांनी बेकरी उत्पादने, मिठाई आणि गोड पदार्थांपासून दूर राहावे. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा किंवा कोणत्या गोष्टी वगळाव्या, याबद्दल पालकांनी तज्ज्ञांची मदत घ्यावी.- इंशारा महेदवी, आहारतज्ज्ञ