

खडकवासला/पुणे: पुणे-पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी (ता. हवेली) येथील हॉटेल तारांगणजवळ बुधवारी (दि. 14 मे) सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव कारचालकाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अॅड. अनिकेत अरुण भालेराव (वय 35, रा. वरदाडे, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला.(Latest Pune News)
तरुण वकिलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने वरदाडेसह सिंहगड, पानशेत भागावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहराकडून पानशेतकडे जाणार्या फॉर्च्युनर कारच्या अज्ञात चालकाने भरधाव आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून अॅड. अनिकेत भालेराव यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. भालेराव यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
या घटनेनंतर चालकाने जखमीला वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी शांताराम गोपाळ भालेराव (वय 52, रा. वरदाडे) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मयत अनिकेत अरुण भालेराव हे शिवाजीनगर कोर्टात वकिलीचा व्यवसाय करीत होते. गरीब, निराधार, अन्यायग्रस्त महिला, वृद्धांना ते मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करत असत.
अनिकेत घरगुती कामासाठी आपल्या दुचाकीवरून खानापूर येथे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. तेथून माघारी वरदाडे येथे येत होते. अनिकेतच्या डोक्याला, दोन्ही पायांच्या गुडघ्यांना आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक रहिवाशांनी तातडीने खानापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच अनिकेतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. फॉर्च्युनर चालकाची शोध घेण्यात आला असून तो सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मद्यपान केल्याचा संशय असल्याने आम्ही त्याचे ब्लड सँम्पल देखील घेतले आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान, डॉक्टरांनी कार चालकाला डिस्चार्ज केल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल.
- सचिन वांगडे, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे