पुणे : पुढारी वैत्तसेवा : केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यातील 12 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याबाबत सूतोवाच केले आहे. मात्र, पुणे शहराला लसीकरणाबाबत केंद्र तसेच राज्य सरकारकडून अद्यापही कोणताही आदेश आलेला नाही. तसेच, शहरात 12 ते 17 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अंदाजे 6 लाख असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने सात राज्यांतून 12 ते 17 वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातही लसीकरण करण्याचा उल्लेख आहे. या मुलांना झायकोव्ह – डी ही लस दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. राजेश भूषण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांची यादीदेखील केंद्राने जारी केली आहे. देशभरातून 28 हजारांहून अधिक जणांवर झायकोव्ह डीची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 1 हजार जण 12 ते 17 वयोगटातील होते.
याबाबत महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, "केंद्र व राज्य शासनाकडून मुलांचे लसीकरण करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. परंतु, पुण्यात एकूण मुलांची संख्या 6 ते 7 लाखांच्या आसपास आहे. सूचना आल्यानंतर त्यांचे लसीकरण करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे."
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 12 ते 18 वयोगटातील मुलांची संख्या ही 6 लाख 34 हजारांच्या आसपास आहे. लस निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्वांच्या लसीकरणासाठी प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी हे प्रशिक्षण गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.