इंदापूर / वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान संचालक असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व आप्पासाहेब जगदाळे हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्याला जिल्हा बँकेवर दोन संचालक पदाचा बहुमान कायम राहिला आहे.
बुधवारी (दि. 22) डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ब वर्ग प्रतिनिधी जागेसाठी आपली सहाव्यांदा उमेदवारी दाखल केली होती. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने तब्बल सहाव्यांदा जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड निश्चित झाली आहे. भरणे यांच्याविरुद्ध धन्यकुमार जगताप (वाणेवाडी, बारामती) व रावसाहेब कोकाटे (इंदापूर) आणि शिरूरमधून एकाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने भरणे यांची बँकेवरिल पकड कायम राहिली आहे.
राज्यमंत्री भरणे १९९५ पासून 'ब'गटातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधित्व करताहेत.पुन्हा एकदा त्यांनी आपल्या विजयाचा षटकार लगावला आहे. भरणे यांच्या विजयानंतर इंदापूर तालुक्यात विजयोत्सव साजरा झाला.शेतकऱ्यांचे प्रश्न तडकाफडकी मार्गी लाऊन प्रसंगी स्वतः कागदपत्रे फिरवणाऱ्या भरणे यांना इंदापूरच्या जनतेने आजवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद,आमदार ते सहा खात्याच्या मंत्रिपदावर जाण्यासाठी बळ दिले आहे.
इंदापूर सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रणजीत निंबाळकर यांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचा बिनविरोध निवड झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही तिसरी निवडणूक बिनविरोध पार पडली. यापूर्वी निरा भिमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यात पाटील व जगदाळे यांना यश आले होते. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांनी विजयाची हॅट्रीक कायम ठेवली आहे.
गेली 19 वर्षे अ वर्ग सोसायटी प्रतिनिधी मतदारसंघात आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे हे संचालक म्हणून प्रतिनिधित्व करताहेत. पुन्हा एकदा पाच वर्षासाठी त्यांना संधी मिळाली आहे. या मतदारसंघावर आप्पासाहेब जगदाळे यांची मजबूत पकड आहे. इंदापूर तालुक्यातील निवडणूकीच रंगत येणार होती; मात्र बिनविरोध झाल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.