Drama Pudhari
पुणे

State Marathi Ekankika Competition: राज्य मराठी एकांकिका स्पर्धेच्या पुणे केंद्रावर उत्साही सुरुवात

महाविद्यालयीन तरुण कलाकारांच्या दमदार अभिनयाने आणि वेगळ्या विषयांनी प्रेक्षकांची मनं जिंकली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वेगळे विषय अन्‌‍ वेगळ्या धाटणीची मांडणी... महाविद्यालयीन संघातील तरुण कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय... संघांच्या एकांकिका पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी अन्‌‍ तरुण कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाला प्रेक्षकांची दाद... असे उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरण राज्य मराठी एकांकिका स्पर्धेत पाहायला मिळाले.

राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या एकांकिका स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीला मंगळवारी (दि. 20) सुरुवात झाली अन् एकापेक्षा एक उत्कृष्ट एकांकिकांच्या सादरीकरणाने पहिला दिवस गाजला. तरुण कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय अन्‌‍ एकांकिकांमधील वेगळ्या विषयांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

संचालनालयातर्फे आयोजित या एकांकिका स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीला मंगळवारी सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, दिग्दर्शक आशुतोष नेर्लेकर, परीक्षक सुनील गोडसे, संभाजी सावंत, पूनम पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पुणे विभागाच्या अधीक्षक जान्हवी जानकर उपस्थित होते. संचालनालयाकडून यंदापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्य मराठी एकांकिका स्पर्धा सुरू करण्यात आली असून, स्पर्धेचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे.

प्राथमिक फेरीत 21 महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी (दि. 20) कोल्हापुरातील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‌‘ग्वाही‌’ या एकांकिकेने प्राथमिक फेरीला सुरुवात झाली.

या एकांकिकेसह दत्ताजीराव कदम आर्ट्‌स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या (इचलकरंजी) ‌‘कूपन‌’, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या (कोल्हापूर) ‌‘फितूर तो चंद्र‌’, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंगच्या (माळेगाव बु.) ‌‘संबळ‌’, आट्‌‍र्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज नागठाणेच्या (सातारा) ‌‘सोयरिक‌’, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या (पुणे) ‌‘चंद्रोदय‌’ या एकांकिकांचे सादरीकरण झाले. ही स्पर्धा गुरुवारपर्यंत (दि. 22) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये रंगणार आहे. स्पर्धेतील एकांकिका प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT