पुणे: राज्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने 15 मे पासून सुरू केलेला संप सलग सहाव्या दिवशी सुरूच आहे.
दरम्यान या प्रश्नावर शासनाने अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. तसेच संघटनेच्या पदाधिका-यांना बैठकीसही बोलावले नाही. त्यामुळे हा बेमुदत संप थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याची बाब पुढे आली आहे. आता या बेमुदत संपात विदर्भ भूमिअभिलेख संंघटनेने उडी घेतली आहे. त्यामुळे संप चिघळण्याची चिन्हे आहेत. (Latest Pune News)
भूमिअभिलेख विभागातील कर्मचा-यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्याकरिता शासनाने तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के. सुधां शु यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून अहवाल मागितला होता. त्याला जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला परंतु अद्याप त्या अहवालावर शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे राज्यभरातील कर्मचा-यांमध्ये वेतनश्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे. भुमिअभिलेख खात्यामधील कर्मचा-यांच्या सेवा भरती नियमांत शासनाने 2012 मध्ये दुरुस्ती करून सर्व पदांकरिता तांत्रिक अहर्ता निश्चित केली. त्यामुळे 2012 पासून या खात्यामधील सर्वच पदाकरिता बी इ सिविल डिग्री, सिविल डिप्लोमा अशी शैक्षणिक अहर्ता लागू केल्यामुळे या खात्यात सर्व पदावर तांत्रिक अहर्ता प्राप्त केलेले कर्मचा-यांनाच नियुक्ती दिल्या जातात.
परंतु या पदाकरिता पगार हा कारकून संवर्गातील दिल्या जात असल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष आहे. तसेच रिक्त पदे शासनाने भरलेली नाहीत. यासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. अशी माहिती संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.
कामकाजावर परिणाम
भूमि अभिलेखच्या पुणे प्रदेश विभागातील सर्वच कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे मोजणीसह कार्यालयीन कामकाजावर चांगलाच परिणाम झालेला आहे.