
पुणे: यंदा मान्सून केरळच्या किनारपट्टीवर चार ते पाच दिवसांत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सरासरी 1 जूनच्या आसपास मान्सून केरळात दाखल होत असतो. मात्र, यंदा तो आठ ते दहा दिवस आधीच दाखल होत आहे.
यावर्षी मान्सूनबाबत वारंवार गुड न्यूज येत आहेत. वास्तविक पाहता मान्सून अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरात 25 ते 27 मेच्या आसपास दाखल होत असतो. मात्र यंदा या मान्सूनची चाहूल 13 मे रोजीच लागली. त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकत आहे. (Latest Pune News)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्राचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरातील दक्षिण मध्य भागातील बहुतांश भाग, ईशान्य बंगालचा उपसागर, ईशान्य भारतातील काही भाग लवकरच मान्सून व्यापणार आहे.
अनुकूल स्थितीमुळे मान्सूनने श्रीलंकेचाही बराचसा भाग व्यापला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तो केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे.