पुणे : महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.
परिषदेचा कार्यकाळ संपून वर्ष उलटत असताना सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्चपूर्वी निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने इच्छुकांच्या आशा नव्याने फुलल्या आहेत.
देशभरातील राज्य बार कौन्सिल निवडणुका यंदा पाच टप्प्यांत घेण्यात येणार असून, महाराष्ट्राचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य वकील परिषदेला 31 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य वकील परिषदेकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, या शक्यतेने इच्छुक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यभरातील इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीचा वेग वाढवला असून, गाठीभेटी, रणनीती बैठका, पॅनेल चर्चा यांना उधाण आले आहे.
काही ठिकाणी तर वकिलांच्या मतदारसंघांमध्ये पूर्वतयारीचे थेट वातावरण निर्माण झाले आहे. वकिलांच्या वर्तुळात निवडणुकीची कुजबुज वाढत असून, येत्या काही दिवसांत राज्य वकील परिषद निवडणुकांच्या रणसंग््राामाची अधिकृत चाहूल लागण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीत व्यक्ती नव्हे तर वकील संघटनेचे हित, व्यवसायातील सुधारणा, पारदर्शकता आणि नव्या पिढीला दिशा देणारी नेतृत्व विचारधारा जिंकली पाहिजे, असे मत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष संतोष खामकर यांनी व्यक्त केले.
निवडणुका बराच काळ लांबल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहिले. निवडणुका न्यायालयीन देखरेखीखाली पार पडणार असल्याने नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. हा निर्णय वकिलांच्या लोकशाही हक्कांना बळकटी देणारा आहे. न्यायालयीन सुविधा, बार रूमची अवस्था, पेन्शन, महिला वकिलांसाठी सुरक्षा-सुविधा, नव्या वकिलांसाठी आर्थिक आणि व्यावसायिक आधार, वकील संरक्षण कायदा या मूलभूत प्रश्नांवर काम होणे गरजेचे आहे.ॲड. डॉ. राजेंद्र अनुभले
निवडणुकांचा बिगुल वाजणार ही आनंदाची बाब आहे. वर्षानुवर्षे विलंब झाल्यानंतर अखेर वकिलांच्या अपेक्षांना न्याय मिळताना दिसत आहे. पारदर्शक प्रक्रियेमुळे नव्या नेतृत्वाला संधी मिळेल आणि वकिलांच्या समस्यांवर ठोस पावले उचलली जातील. निवडणुका वेळेत घेण्याची सक्ती झाल्याने वकिलांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, परिषदेचे कामकाज गतिमान होण्यास मदत मिळेल.ॲड. विकास ढगे-पाटील, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन