पुणे

एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची अखेर हकालपट्टी

Laxman Dhenge

पुणे : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सहकार आयुक्तांनी जोरदार दणका दिला असून सदावर्ते यांचे निकटचे नातेवाईक असलेल्या सौरभ पाटील यांची एसटी सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सहकार आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. या बँकेवर सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची सत्ता आहे.

नियमानुसार व्यवस्थापकीय संचालक या जबाबदारीच्या पदावर कोणाचीही नियुक्ती करताना त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक असते. पाटील यांची नियुक्ती करताना अशी अनुमती न घेतल्याबद्दल सहकार खात्याने यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता थेट कारवाई करण्यात आली आहे.  एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना किमान आठ वर्षांचा अनुभव अपेक्षित असतो. याखेरीज 35 वर्षे वयाची अट आहे. पाटील यांचे वय 25 च्या आसपास आहे.

त्यांच्याकडे आठ वर्षांचा अनुभवही नाही. ते कोणत्याही निकषात बसत नव्हते. हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर सहकार खात्याने अखेर कारवाईचा बडगा उगारला. सहकार आयुक्तांनी एसटी बँकेला पत्र लिहून पाटील यांना आठवडाभरात काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. याच कालावधीत नव्या संचालकांची नेमणूक करा. त्याचबरोबर अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा, असेही पत्रात म्हटले आहे. पाटील यांच्यावर झालेली कारवाई हा अ‍ॅड. सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सदावर्ते यांच्या पॅनेलची एसटी बँकेवर सत्ता आहे. पाटील यांची हकालपट्टी झाल्यामुळे आता एसटी बँकेला नव्या व्यक्तीची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालकपदी करावी लागणार आहे.

विधिमंडळातही मुद्दा गाजला

एसटी बँकेत सौरभ पाटील यांच्या नियुक्तीचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांनी आक्रमकपणे उपस्थित केला होता. एसटी कामगार संघटनेनेही सहकार आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत सहकार आयुक्तांनी कारवाई केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT