पुणे

सिटी सेंटर परिसरात असणार प्रशस्त महापालिका भवन; आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडच्या ऑटो क्लस्टरसमोरील मोकळ्या जागेत महापालिकेचे प्रशस्त असे पर्यावरणपूरक प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. भवन सिटी सेंटरचा एक भाग असणार आहे. त्यामुळे त्या भागास नवीन अद्ययावत लूक प्राप्त होणार आहे, असा दावा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केला.

नवीन प्रशासकीय इमारत 13 मजली असणार आहे. त्यासाठी 312 कोटी 21 लाख खर्चाची निविदा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये मोठ्या प्रकल्पाचा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्या संदर्भात विचारले असता ते बोलत होते.

आयुक्त पाटील म्हणाले की, सायन्स पार्कसमोर पालिकेची सुमारे 35 एकर जागा आहे. त्या जागेत अद्ययावत असे सिटी सेंटर उभारले जाणार आहे. त्या अंतर्गत 7 एकर जागेत महापालिका भवन उभारले जाणार आहे. तो सिटी सेंटरचा एक भाग असणार आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या दर्शनी भागात ती इमारत उभी राहिल.

पुढील 50 वर्षांचा विचार करून त्याची अद्ययावत रचना करण्यात आली आहे. नव्या भवनामुळे शहराचा नावलौकीक वाढणार आहे. सर्वसाधारण सभेने नव्या इमारतीच्या प्रस्तावाला पूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यावर आता नियमानुसार कार्यवाही सुरू आहे.
तसेच, शहरातील 18 मीटर रूंदीवरील सर्व मोठ्या रस्त्याची साफसफाई यांत्रिक पद्धतीने केली जाणार आहे. त्यासंदर्भातील निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिस्त लागण्यासाठी दंडाची रक्कम वाढविणार

रस्त्यांवर कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी व शौच करणे, राडारोडा व मेडिकल वेस्ट उघड्यावर फेकणे, कचरा जाळणे आदींसह विविध कारणांमुळे नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ग्रीन मार्शल पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. दंड करूनही नागरिक रस्त्यांवर कचरा टाकत आहेत. उलट, त्यात वाढ होत आहे. नागरिकांना शिस्त लागावी म्हणून दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT