कांदा-बटाटा विक्रेत्याच्या मुलाची अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी; मेकॅनिकल इंजिनिअर्समध्ये मास्टर्स करण्यासाठी घर ठेवले गहाण Pudhari
पुणे

कांदा-बटाटा विक्रेत्याच्या मुलाची अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी; मेकॅनिकल इंजिनिअर्समध्ये मास्टर्स करण्यासाठी घर ठेवले गहाण

तरुणाचे होतेय कौतुक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कांदा-बटाटा विक्री हा वडिलांपासून चालत आलेला व्यवसाय. त्याला दोन भावांसह इतर कुटुंबीयांची साथ होतीच; मात्र या व्यवसायाच्या पुढे जाऊन परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची मुलाने प्रबळ इच्छाशक्ती दाखवली.

घर गहाण ठेवून आम्हीही त्याला आर्थिक पाठबळ दिले आणि आज मुलाने अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉइस विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पदवी मिळवली, याचा आनंद शब्दापलीकडचा आहे, ही भावना आहे मंडई येथील कांदा-बटाटा विक्रेते संजय हरिहर गायकवाड यांची. (Latest Pune News)

मूळ बदामी हौद परिसरातील रहिवासी असलेल्या गायकवाड यांचा कांदा -बटाटा विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायावर त्यांनी टु-बीएचके घर घेतले. याच काळात मुलाने मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले होते आणि त्याला अमेरिकेतून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घ्यावयाचे होते.

मात्र त्यासाठीचा खर्च होता 50 लाख. तो खर्च उभारण्यासाठी त्यांनी घर गहाण ठेवले आणि मुलानेही त्याची जाणीव ठेवत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पदवी मिळवली.

त्याबद्दल सांगताना मुलगा मल्हार गायकवाड म्हणाला, आई-वडलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा खूप आनंद आहे. शैक्षणिक आयुष्यातील टप्प्यावरचा माझा प्रवास साहसांनी, आव्हानांनी आणि स्वतःची परीक्षा पाहणार्‍या क्षणांनी भरलेला होता.

पण या यशाचा आनंद साजरा करत खरे भागीदार माझे आई-वडील, गुरुजन आणि मित्रवर्ग आहेत. त्यांच्यामुळेच हे यश मिळवू शकलो. मी फक्त माझ्या प्रयत्नांवर नव्हे, तर त्या नायकांवर प्रकाश टाकतो, ज्यांच्यामुळे हे शक्य झाले.

पदवीधर झाल्यावर आपण नेहमीच आपल्या चिकाटी, समर्पण आणि मेहनतीचे कौतुक करतो. आपण वाचनालयात घालवलेले तास, रात्रभर केलेली प्रोजेक्ट्स, आणि उत्कृष्टतेच्या सततच्या शोधाबद्दल बोलतो.

पण मला वाटते, यात काहीच वेगळं नाही. दहापैकी नऊ जण हेच करतात. हे एक सामूहिक अनुभव आहे, जिथे आपल्या मागे उभे राहणार्‍यांचा आधार महत्त्वाचा असतो, याची जाणीव मला या प्रवासात पदोपदी जाणवली.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून, घर शोधणे, किराणा सामान सांभाळणे, नवीन संस्कृतीशी जुळवून घेणे आणि शेकडो नोकर्‍यांसाठी अर्ज करणे ही सगळी आव्हाने आहेत. ही आव्हाने जवळपास अपेक्षित असतात आणि आपण इथे येताना त्यासाठी मी तयार होतोच; मात्र माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या आशा आणि बचती माझ्या स्वप्नांवर लावल्या, अशा त्यागाची मी कधीच परतफेड करू शकणार नाही.
- मल्हार गायकवाड, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT