श्रावणी यात्रेसाठी सोमेश्वर मंदिर सज्ज; उद्या श्रावणी सोमवारी Pudhari
पुणे

Someshwar Temple Shravan: श्रावणी यात्रेसाठी सोमेश्वर मंदिर सज्ज; उद्या श्रावणी सोमवारी

समाधानकारक पावसामुळे यंदा भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वरनगर: श्रीक्षेत्र करंजे (ता. बारामती) येथील श्री सोमेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी (दि. 28) भरणार्‍या यात्रेची सोमेश्वर देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे. सोमयाचे करंजे म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सोमेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येथे येतात. समाधानकारक पावसामुळे यंदा भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यात्रेनिमित्त मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच, मंदिराला आकर्षक रंगरंगोटी, विद्युतरोषणाई, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग आणि महाप्रसादाची सोय केली आहे. स्वयंभू श्री शिवलिंग दर्शनासाठी रांगेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंता मोकाशी आणि सचिव विपुल भांडवलकर यांनी दिली.  (Latest Pune News)

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी, मिठाई आणि इतर दुकाने लावण्यात येतात. श्रावणातील पवित्र महिन्यात भाविकांकडून मंदिरात होमहवन, पूजा पार पडते. भाविकांनी शिस्तीत दर्शन घेत देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त समितीने केले आहे.

पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. भाविकांनी शिस्तीत दर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत.

भाविकांसाठी सोयी-सुविधा

दर सोमवारी तसेच श्रावण महिन्यात दररोज सकाळी व संध्याकाळी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांसाठी भक्तनिवासाची सोय आहे. गर्दी टाळण्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर पार्किंगची सोय केली आहे. तसेच पेढे, स्टेशनरी, हॉटेल, पाळणे या दुकानांच्या रांगा एकमेकांपासून दूर आणि स्वतंत्र असणार आहेत. बस सुविधेसाठी विविध आगारांना पत्रव्यवहार केला आहे. ट्रस्टकडून विहिरीला कुंपण करून घेतले असून, दर्शनरांगेत सुसूत्रता यावी व चोर्‍या होऊ नयेत म्हणून दर्शनबारी ओवरीच्या बाहेर आणली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT