सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येत्या गाळप हंगामात 14 लाख टन उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याकडे 35 हजार एकराची नोंद झाली असून, अपेक्षित 31 हजार 500 एकर क्षेत्रातून ऊस उपलब्ध होईल.
त्यात सभासदांचा साडेबारा लाख टन ऊस उपलब्ध आहे. दीड ते दोन लाख टन गेटकेन उसाचे नियोजन केले आहे. गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. (Latest Pune News)
ते म्हणाले, आगामी हंगामासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 5 महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन 9 हजार 500 टन क्षमतेने गाळप केले जाईल. सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण होताच 18 मेगावॅटचा प्रकल्प 36 मेगावॅटचा पूर्ण झाला आहे. पावसाची परिस्थिती पाहता हंगाम उशिरा सुरू झाल्याने फटका बसतो. येणारा हंगाम लवकरात लवकर सुरू करावा, अशी विनंती सरकारला केली आहे.
सोमेश्वर डिस्टिलरी प्रकल्पांतर्गत डिस्टिलरीचा विस्तार 30 केएलपीडीवरून 90 केएलपीडीपर्यंत, तर इथेनॉल प्लांटचा विस्तार 30 केएलपीडीवरून 120 केएलपीडीपर्यंत करण्यात येणार आहे. कर्ज उभारणी, स्वभांडवल आदीबाबत सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कोजन, डिस्टिलरी, इथेनॉल यातून सभासदांना अधिकचा दर देता येणार आहे. गत हंगामात गाळप झालेल्या उसाला 3400 रुपये प्रतिटन अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेटकेनधारकांसाठी 3200 रुपये दर दिला जाईल. हंगाम संपल्यानंतर टनाला 373 रुपये देण्यात आले असून, आत्तापर्यंत सभासदांना टनाला 3173 रुपये अदा करण्यात आले होते. उर्वरित राहिलेल्या 227 रुपयांमधून वार्षिक सोमेश्वर देवस्थानसाठी टनाला 1 रुपया कपात केला जाणार असून, उर्वरित 226 रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे जगताप म्हणाले.
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने सर्व सुविधा दिल्या असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. मंगल कार्यालय सुरू करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. कारखान्याच्या को-जनमधून 15 कोटी 47 लाख रुपये नफा झाला आहे. डिस्टिलरीमधून 9 कोटी 57 लाख नफा झाला आहे. त्यामुळे 3400 रुपये प्रतिटन उच्चांकी दर दिल्याचे ते म्हणाले.
सोमेश्वर कारखाना परिसरातील वाहतुकीचा ताण लक्षात घेता पर्याय म्हणून करंजेपूल ते डिस्टिलरी गेटपर्यंत पर्यायी रस्त्याची आवश्यकता आहे. दुकानदारांबरोबर बैठका झाल्या असून, त्यांना नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे. सर्वांना गाळे उपलब्ध करून देऊन सहकार्य केले जाईल, असे जगताप यांनी या वेळी स्पष्ट केले.