Someshwar Sugar Factory Pudhari
पुणे

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर साखर कारखान्यासाठी उद्या मतदान; २१ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात

९३ केंद्रांवर २७ हजार ७६७ मतदार बजावणार हक्क; सोमवारी माळेगाव येथे मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ संचालकांसाठी रविवारी (दि. ११) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९३ केंद्रांवर मतदान होणार आहे. सर्वांनी या निवडणुकीसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पुणे विभागीय सहनिबंधक व श्री सोमेश्वर सहकारीचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी केले आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर या दोन तालुक्यांत तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण, अशा दोन तालुक्यात विस्तारलेले आहे. कारखान्याची एकूण मतदारसंख्या उत्पादक सभासद प्रतिनिधी २७ हजार ६२६ तसेच ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था आणि पणन संस्था १४१, असे मिळून २७ हजार ७६७ इतकी संख्या आहे.

या निवडणुकीसाठी ५५६ उमेदवारांचे एकूण ६०१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीअंती एकूण ५१४ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. उमेदवार माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत ३ पॅनेलचे ६२ उमेदवार व २१ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर ७०० मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस विभागाने प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सोमवारी (दि. १२ ऑक्‍टोबर) सकाळी ९ पासून अजंता मॅजेस्टिक बँक्वेट हॉल, निरा-बारामती रोड, माळेगाव बु. या ठिकाणी एका फेरीमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी ४५० मतमोजणी कर्मचारी नियुक्त केले असून, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील तैनात केला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या १४ शासकीय ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर निर्धारित वेळेत मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अशी आहे २१ संचालकांची निवड

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड या संचालक मंडळात एकूण २१ संचालक निवडून द्यायचे असून, उत्पादक सभासद प्रतिनिधी गट क्र. १ ते ५ मधून प्रत्येकी ३ याप्रमाणे १५ संचालक, ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदानसंघातून एक संचालक, महिला राखीव मतदारसंघातून दोन संचालक, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून एक संचालक, इतर मागासवर्गीय प्रवर्ग मतदारसंघातून एक संचालक, भटक्या जाती-विमुक्त जमाती-विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून एक संचालक, असे संचालक मंडळ असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT