

सासवड: सासवड शहरासह पुरंदर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा लाभलेल्या सोनोरी (ता. पुरंदर) येथील आदिशक्ती आंबऋषी देवी (तुळजाभवानी माता) मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्राच्या नऊ दिवसांत देवीच्या दर्शनासाठी सासवड शहरासह सोनोरी, दिवे आणि पंचक्रोशीतील गावांमधून भाविकांची मोठी गर्दी होत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जात आहे, अशी माहिती मंदिराचे उपाध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी दिली.
सोनोरी येथील आंबऋषी देवीचे मंदिर हे तुळजाभवानी मातेचे रूप म्हणून प्रसिद्ध असून, या देवस्थानाला पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देवस्थानची मालकी, देखभाल तसेच पूजा-अर्चेची परंपरा काळे कुटुंबीयांकडून पिढ्यान् पिढ्या जपली जात आहे. मंदिर खासगी देवस्थान असले तरी नवरात्रोत्सवाच्या काळात संपूर्ण सोनोरी गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि देवीभक्त एकजुटीने विविध धार्मिक सेवा बजावतात.
भक्ताच्या हाकेला देवी प्रसन्न झाली आणि त्याला दृष्टांत देत 'तू परत गावी जा; मात्र मागे वळून पाहू नकोस,' असे सांगितल्याची आख्यायिका आहे. भक्त गावी परत येत असताना सोनोरीच्या वेशीजवळ त्याला देवीच्या उपस्थितीची चाहूल लागली आणि त्याने मागे वळून पाहिले.
त्याच ठिकाणी देवी अदृश्य झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर 'ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहिले, त्याच ठिकाणी मी विराजमान आहे. येथेच माझी पूजा-अर्चा करा,' असा दृष्टांत झाल्याचे भाविक मानतात.
या श्रद्धास्थानाचे रूपांतर कालांतराने भव्य मंदिरात झाले. सासवडपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ओढ्यालगत रस्त्यापासून सुमारे ३० फूट खोल भागात हे मंदिर वसलेले आहे. रस्त्यापासून सुमारे २० ते २५ पायऱ्या उतरून मंदिराच्या गाभाऱ्यात पोहचावे लागते. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्गही प्रशस्त करण्यात आला आहे.
सासवड शहरातूनही पहाटेपासून शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी सोनोरीकडे येत असल्याने मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ असते. पारंपरिक धार्मिक विधी, भक्तिगीते, ढोल-ताशांचा गजर आणि देवीच्या जयघोषाने नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक रंग चढतो.
तुळजापूरहून देवी सोनोरीत आल्याची आख्यायिका
आंबऋषी देवीच्या प्रगटस्थळामागे भक्ती आणि श्रद्धेची रंजक आख्यायिका सांगितली जाते. काळे कुटुंबातील एक भक्त दरवर्षी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जात असे.
मात्र, वार्धक्यामुळे पायी प्रवास करणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे त्याने मनोभावे देवीची सेवा करून, 'माते, आता मला तुळजापूरला येणे शक्य होणार नाही. तूच माझ्या गावात ये,' अशी आर्त विनंती केली.
जागृत देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा
आदिशक्ती आंबऋषी देवी हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात काळे कुटुंबीयांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह स्नेहभोजनाचे आयोजन केले जाते. आंबऋषी देवीच्या भक्तांच्या वतीने नवरात्रातील नऊही दिवस छबिन्याचे सादरीकरण केले जाते.
ग्रामस्थ, तरुणवर्ग आणि देवीभक्तांची एकजूट, स्वयंसेवकांचे नियोजन आणि धार्मिक परंपरेप्रती असलेली निष्ठा, यामुळे सोनोरीचा नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहात पार पडतो.
पालखीतून देवीचा मुखवटा व पादुका
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी सोनोरी व दिवे पंचक्रोशीतील भाविकांकडून देवीचा मुखवटा व पादुका पालखीतून वाजत-गाजत मंदिरात आणण्याची परंपरा आहे. त्यानंतर मूळ गाभाऱ्यात विधिवत पूजा-अर्चा करून घटस्थापना केली जाते. नवरात्राच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा व छबिन्यांचे आयोजन केले जाते.