Someshwar Sugar Factory Election Pudhari
पुणे

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नवा ट्विस्ट; पुरुषोत्तम जगतापांच्या मेळाव्यामुळे राजकीय हालचालींना वेग

अजित पवारांच्या नाव-फोटोच्या वापरावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांचे पत्रक; संजय जगताप भेटीसाठी वाणेवाडीत दाखल

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारकान्याच्या निवडणूकीत क्षणाक्षणाला नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी आपल्या समर्थकांचा मेळाव वाणेवाडीतील रामराजे सोसायटीच्या सभागृहात आयोजित केला आहे.

सभास्थानी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पत्रक प्रसिद्धीला देत अजितदादांच्या नावाचा व फोटोचा वापर त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय कोणीही करू नये असे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणूकीत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सोमेश्वरसाठी राष्ट्रवादी (अप) यादीला अंतिम स्वरुप आले आहे. परंतु या यादीतील काही नावांवरून रणकंदन सुरु झाले आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप त्यातून नाराज झाले आहेत. त्यांनी समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. दुसरीकडे बारामतीत राष्ट्रवादी भवनात पक्षाचा मेळावा पार पडतो आहे.

जगताप यांची समजूत घालण्याचे प्रयत्न पक्ष नेतृत्वाकडून सुरु आहेत. त्यासाठी छत्रपती कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक वाणेवाडीत दाखल झाले आहेत. मंत्री दत्तात्रय भरणे हे ही जगताप यांची भेट घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीत थांबत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. या परिस्थितीत आता पक्षाने अजितदादांचे नाव व फोटो कुटुंबियांच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू नये, असे पत्रकच प्रसिद्धीला दिल्याने वादात आणखीच भर पडली आहे.

संजय जगताप भेटीसाठी दाखल

दरम्यान पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप हे पुरुषोत्तम जगताप यांची भेट घेण्यासाठी वाणेवाडीत दाखल झाले आहेत. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरु आहे. ही चर्चा संपल्यानंतर ते मेळावास्थानी येणार आहेत. तेथे ते कोणती भूमिका मांडतात याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT