सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाकडून अंतिम उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांच्या निवडीबाबतची उत्सुकता कायम आहे. कोणत्या गटातून कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या पॅनेलबाबत आहे.
कारखान्याच्या २१ जागांसाठी छाननीनंतर ५१४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीचे चित्र सध्या बहुरंगी झाले आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसमोर पॅनेलची अंतिम बांधणी करताना इच्छुकांमधून उमेदवारांची निवड करण्याचे आव्हान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडे मोठ्या संख्येने इच्छुक असल्याने मुलाखती व स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार करून अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे विद्यमान पदाधिकारी, माजी संचालक, तरुण चेहरे, महिला तसेच विविध गावांतील इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळते, याकडे कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांत आहे. पक्षीय पॅनेल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीतील समीकरणे स्पष्ट होणार आहेत. त्यानंतर प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. २ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. 11 ऑक्टोबरला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे.