सोमेश्वरनगर: राज्यातील ऊसगाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी 9.12 टक्क्यांच्या सरासरी साखर उताऱ्याने आतापर्यंत 60 लाख 84 हजार टन उसाचे गाळप करून 53 लाख 40 हजार क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन केले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने शुक्रवारी (दि.26) 5 लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करत 5 लाख 56 हजार क्विंटल साखर उत्पादन केले.
यंदाच्या गाळप हंगामात खासगी साखर कारखाने ऊसगाळपात पुढे आहेत. मात्र, त्यात सहकारी साखर कारखान्यांचा जास्तीचा साखरउतारा ठेवण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. निरा खोऱ्यातील सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती कारखान्याने साखर उताऱ्यात पाहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. सोमेश्वर कारखान्याने 11.6 चा साखरउतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
चालू गळीत हंगामात राज्यासह जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखान्यांनी देखील त्यांनी गाळपक्षमता वाढविली आहे. वाढवलेल्या गाळपक्षमतेमुळे चालू हंगामात जिल्ह्यातील साखर कारखाने मार्च महिन्यातच बंद होण्याची शक्यता आहे.
ऊसगाळापात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. साखरउताऱ्यात सहकारी कारखान्यांनी बाजी मारली आहे. ऊसगाळपात बारामती ॲग््राो आणि दौंड शुगरने, तर साखरउताऱ्यात सोमेश्वर साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची मुबलक उपलब्धता आहे. मात्र, सहकारी कारखान्यांच्या भोवती असणाऱ्या सर्वच खासगी कारखान्यांनी स्वतःची गाळपक्षमता वाढवली असून, कार्यक्षेत्राची मर्यादा ओलांडून जादा ऊसदराचे आमिष दाखवत कारखाने एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवत आहेत. सातारा जिल्ह्यातील कारखाने पुणे जिल्ह्यातून ऊस नेत आहेत.
उतारा 11.6 टक्के
सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्याचे ध्येय समोर ठेवून ऊसगाळपात तिसऱ्या क्रमांकावर असणार्या सोमेश्वर कारखान्याने मात्र साखरउताऱ्यात जिल्हात बाजी मारली आहे. 11.6 टक्केचा साखरउतारा ठेवत सोमेश्वर कारखाना अव्वलस्थानी आहे. 10.81 टक्क्यांचा साखरउतारा राखत छत्रपती दुसऱ्या आणि 10.81 टक्के चा साखर उतारा ठेवत माळेगाव कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.