सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील निंबुत तसेच सोमेश्वरनगर परिसरात शेतातील विद्युत मोटर चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी मोठ्या खर्चाने मोटर बसवतात; मात्र, सतत होत असलेल्या चोऱ्यांमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शनिवारी (दि.२२) रात्री ज्ञानेश्वर भुजंगराव काकडे यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेली ५ एचपीची मोटर चोरीला गेल्याचे सकाळी त्यांच्या मुलाच्या लक्षात आले.
काकडे यांनी सांगितले की, “परिसरात यापूर्वीही अशा अनेक चोऱ्या झाल्या आहेत. चोर हे स्थानिक असावेत. मोटरची किंमत किमान ३० हजार रुपये असून चोर ती कमी दरात विकत असावेत.”
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या अगोदर अशा घटनांची नोंद झाली आहे. पोलिस चोरांचा तपास करीत आहेत. चोरीची मोटर किंवा केबल कोणीही विकत घेऊ नये. आज दुसऱ्याची मोटर विकणारे उद्या आपलीच मोटर चोरी करू शकतात.
संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात सतत वाढणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.