Socialist Leader Activist Baba Adhav Passes Away
पुणे : कामगार, हमाल, माथाडी व कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारा बुलंद आवाज, असंघटित कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव (वय ९६) यांचे निधन झाले.
पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वृध्दापकाळाने सोमवारी रात्री आठ वाजून 25 मिनीटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, असीम व अंबर ही दोन मुले आहेत.
बाबा आढाव पत्नी शीला यांच्यासह पुण्यात बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास होते. असीम हा अमेरिकेत बोस्टन येथे तर अंबर हा कॅनडातील टोरँटो येथे वास्तव्यास आहे. बाबांची तब्येत बिघडल्याने काही दिवसांपूर्वीच ते पुण्यात परतले होते.
हमाल पंचायतीचे संस्थापक डॉ. बाबा आढाव यांना फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाल्याने उपचारासाठी ह्रदयविकारतज्ज्ञ व फिजिशियन डॉ. अभिजित वैद्य यांच्या निगराणीखाली पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात काही दिवसांपूर्वी दाखल केले होते. त्यांचे वयही जास्त असल्याने आजाराची तीव्रता बळावत गेली. प्रकृती ही उपचारांना साथ देत नसल्याने तब्येत गंभीर झाली.
डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अभिजित वैद्य यांनी दिली. डॉ. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल फिजिशियन डॉ. अजित तांबोळकर, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. विजय रमणन, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. जयदीप दाते आणि डॉ. नितीन अभ्यंकर हे तज्ज्ञांचे पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते.
अंत्यसंस्कार उद्या संध्याकाळी
बाबा आढावांचे पार्थिव उद्या (मंगळवारी) सकाळी 10 वाजता हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अंत्यसंस्कार सायंकाळी साडे पाच वाजता वैकुंठ स्मशान भूमीत केले जाणार आहे.