SNDT Karve Statue Controversy Pudhari
पुणे

Pune SNDT Karve Statue Controversy: एसएनडीटी पुण्यात कर्वे पुतळा प्रलंबित; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

64 वर्षांपासून प्रतीक्षा; निवृत्त प्राध्यापकांकडून कुलगुरूंना थेट सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अर्थात एसएनडीटीच्या पुण्यातील कॅम्पस परिसरात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुतळा उभारण्याचे कार्य त्यांच्या मृत्यूनंतर गेली 64 वर्षे प्रलंबित आहे, याचे भान अद्याप विद्यापीठ प्रशासनास आलेले नाही. त्यामुळे संस्थेचे संस्थापक कर्वेंची उपेक्षा कधी संपणार? असा थेट प्रश्न संस्थेचे निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांना विचारला आहे.

कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या पुणे परिसरातील वसतिगृह सक्षमीकरण व सुशोभीकरण या उपक्रमासाठी पूनावाला विश्वस्त संस्थेने काही देणगी दिली. या देणगीच्या कृतज्ञतेपोटी येथे श्रीमती पूनावाला यांचा पुतळा व भव्य स्मारक परिसरात केंद्रस्थानी उभारण्यात आला. परिणामी, चित्र असे निर्माण झाले, की हे विद्यापीठ श्रीमती पूनावाला यांनी उभे केले; म्हणून त्यांचे एवढे भव्य स्मारक उभे केले आहे.

कर्वेंच्या पुतळ्यासाठी कर्मचाऱ्यांची मदत

तत्कालीन प्राध्यापकांनी श्रीमती पूनावाला यांचा पुतळा केंद्रस्थानी उभारण्यास विरोध केला. वसतिगृहासाठी देणगी दिली आहे, वसतिगृहात पुतळा बसवा, हा प्रस्ताव पूनावाला संस्थेने मान्य केला. तसेच, महर्षी कर्वे यांचा पुतळा संस्थेतील दर्शनी भागात बसवावा, असे ठरले. या पुतळा उभारणीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनातून मदत देखील दिली. गेल्या दोन वर्षांत पूनावाला यांचा पुतळा हटविला नाही व कर्वेंचा पुतळा देखील उभारण्यात आला नाही.

स्मारक उभारणीच्या कार्यातील दिरंगाई अक्षम्य

कर्वेंच्या पुतळा उभारणीच्या कार्यात होणारी दिरंगाई अक्षम्य आहे. संस्थेच्या स्थापनेला 110 वर्षे झाली. परंतु, कर्वेंचे योग्य स्मारक होऊ शकले नाही. पुतळा बसविण्यासाठी शिल्पकाराने दिलेल्या सूचनांचे पालन संस्थेने केले नाही. परिणामी, पुतळा प्रत्यक्ष उभारण्यात येणाऱ्या अडचणींकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष गंभीर आहे. याला जबाबदार कोण? असा थेट प्रश्न देखील कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

पुतळ्यासाठी ‌‘तारीख पे तारीख‌’

पुतळा बसविण्यासाठी अगोदर 18 एप्रिल 2025 तारीख ठरली. त्यानंतर 9 नोव्हेंबर कर्वे यांच्या पुण्यतिथीचा मुहूर्त काढण्यात आला. त्यानंतर 7 एप्रिल, 13 एप्रिल म्हणजे कर्वे जयंतीपूर्वी किमान पुतळा उभारावा व 18 एप्रिल 2026 ला त्यांच्या जयंतीनिमित्त त्याचे अनावरण करण्यात यावे, असेही ठरले. परंतु, हे सर्व फोल ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT