महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी असून, उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये (अजित पवार गट) खरी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, झोपडपट्ट्यांतील नागरिक कोणाला मतदान करणार, यावर देखील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
प्रभागाची लोकसंख्या 73 हजार 104 इतकी आहे. नव्या प्रभागरचनेत दत्तवाडी परिसरातील काही भाग या प्रभागातून वगळला आहे. तसेच, हिंगणे खुर्दचा विश्रांतीनगर, विठ्ठलवाडी परिसर या प्रभागाला जोडला आहे. उर्वरित प्रभाग पूर्वीसारखाच आहे. 2017 पूर्वी राष्ट्रवादी काँग््रेास आणि काँग््रेासचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागामध्ये नंतर भाजपने जम बसविला आहे. यामुळे भाजपात गेल्या काळात मोठ्या प्रमाणात इनकमिंगही झाली आहे. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे उमेदवार अनिता कदम, आनंद रिठे, शंकर पवार आणि राष्ट्रवादी काँगेसच्या प्रिया गदादे विजयी झाल्या होत्या. आगामी निवडणुकीसाठी या प्रभागात ‘अ’ गट अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला), ‘ब’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि ‘क’ व ‘ड’ गट सर्वसाधारण, असे आरक्षण पडले आहे. आगामी निवडणुकीत या प्रभागात विरोधकांकडून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. महायुती न झाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये (अजित पवार गट) लढत होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, विविध सामाजिक कार्यक्रम, देवदर्शन यात्रांसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. या प्रभागात झोपडपट्टी, कष्टकरीवर्ग जास्त असल्याने त्याचा फायदा कोणाला होणार, याबाबत सध्या तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. आरक्षण सोडतीत या वेळेस अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने भाजपचे माजी नगरसेवक आनंद रिठे तसेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे किंवा घरातील महिलांना या प्रभागात उभे करावे लागणार आहे. तसेच, सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर आहे.
सर्वसाधारण महिलाऐवजी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने भाजपच्या माजी नगरसेविका अनिता कदम पुन्हा रिंगणात उतरणार की त्यांचे पती संतोष कदम हे या वेळी निवडणुकीला सामोरे जाणार, याबाबत चर्चा सुरू आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण कायम राहिल्याने राष्ट्रवादी काँग््रेासकडून (अजित पवार गट) माजी नगरसेविका प्रिया गदादे पुन्हा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन जागा असल्याने भाजपकडून माजी नगरसेवक शंकर पवार यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. ऐनवेळी भाजपच्या वतीने या प्रभागात एखादा आयात उमेदवारही उभा केला जाईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
भाजपमधील इच्छुकांनी ‘एकला चलो रे’चा नारा देत प्रभागातील पूर्ण जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रवादी काँग््रेासनेही (अजित पवार गट) सर्व जागांची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील इच्छुकांना आघाडी होण्याची प्रतीक्षा आहे. भाजप वगळता अन्य पक्षांतील इच्छुकांची संख्या कमी आहे. आरक्षण जाहीर झाले असले, तरी बहुतांश इच्छुक युती, आघाडी अथवा स्वतंत्र लढण्याच्या निर्णयानंतर समोर येण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती गटात महिला आरक्षण लागू झाल्याने बहुतांश पक्षांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. या प्रभागात जनता वसाहत, पानमळा, 132, 130 या झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्टीतील मतदारांची संख्या जवळपास 45 हजारांपेक्षा आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मतदारांची भूमिका या प्रभागात निर्णायक अशी ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या वतीनेही या वेळी काँग््रेास, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) या पक्षांनी प्रभाग काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नावर आवाज उठवून महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी प्रभागात जम बसविला असल्याचे चित्र आहे.
जनता वसाहतीतील मते कोणाच्या पारड्यात?
जनता वसाहतीचा पूर्ण परिसर या प्रभागात आला आहे. या भागात जवळपास 30 हजारांहून अधिक मतदार आहेत. यात कष्टकरी, मजूर आदींचा समावेश आहे. आगामी निवडणुकीत झोपडपट्टीतील मतदार कोणाला साथ देणार, यावर सर्व पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. यासाठी इच्छुकांनी या भागातील मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.
विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार
भाजप : अनिता कदम, तुकाराम पवार, आनंद रिठे, संतोष कदम, तुकाराम पवार, नलिनी आढाव आदी. राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) : प्रिया गदादे, शिवाजी गदादे, प्रेमराज गदादे, वैशाली चांदणे, अर्चना हनमघर, नितीन हनमघर. काँग््रेास : अविनाश खंडारे, अनिता धिमधिमे, बाळासाहेब कांबळे, आबा जगताप. राष्ट्रवादी कॉंग््रेास (शरद पवार गट) : समीर पवार, नीलेश पवार, अमोघ ढमाले, संतोष पिसाळ. वंचित बहुजन आघाडी : दत्ता सुरते, पंचशीला कुडवे, रागिणी गायकवाड, हनुमंत फडके. शिवसेना (ठाकरे गट) : सुरज लोखंडे, रोहन सांडभोर. शिवसेना (शिंदे गट) : राहुल तुपेरे, आरपीआय : आशा ताकपेरे.