पुणे

पुणे : वस्तीतील मुलांचीही जुळतेय संगीताशी नाळ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वस्तीतल्या शाळकरी मुलांचे संगीताशी नाते तसे दुर्मीळच… पण, या वस्तीतील मुलांचे संगीताशी बंध जुळले अन् या संगीताच्या सुरेल प्रवासाने सुमारे 222 विद्यार्थ्यांना संगीत परीक्षेत यश मिळवून दिले आहे. संगीताशी कोणताही सूर जुळल्यानंतर मुलांनी या सुरांशी मैत्री जमवली अन् या मैत्रीने त्यांना संगीताच्या दुनियेत यशाचे शिखर गाठण्यासाठीचा मार्ग दिला. वस्तीतल्या जगण्यात सप्तसूरही नसलेल्या वस्तीतल्याच मुलांनी संगीत परीक्षेत आपल्या मेहनतीने बाजी मारली आहे.

कलेचे क्षेत्र असलेल्या तबला, हार्मोनियम वादनासह गायनाची स्पर्धा मुंबई येथील गांधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या परीक्षेसाठी पुणे महानगरपालिकेच्या संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनीतील 222 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोथरूड, वारजे या परिसरातील वस्त्यांमधून येणार्‍या या मुलांनी यंदा देदीप्यमान यश संपादन केले. गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत 65 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी व 95 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आम्हीही कला सादर करण्यात मागे नसल्याचे दाखवून दिले.

गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल ज्येष्ठ संगीतकार पंडित यादवराज फड, ज्येष्ठ तबलावादक अशोक मेरो, शिवव्याख्याते धर्मराज हांडे, महापालिका उपायुक्त राजीव नंदकर यांच्या हस्ते घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी तबला, हार्मोनियम वादनासह सरस्वती स्तवन, राग दुर्गा, राग बागेश्री, राग भूप (बंदिश), राग यमन, शुध्द स्वरांची सरगम गीत, तबला-त्रिताल वादन, विठ्ठल गीतांची सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संगीत शिक्षक अर्चना इरपतगिरे, दीपाली कोल्हटकर, मंगेश राजहंस व उमेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT