पुणे

पुणे : सिंहगडरोड उड्डाणपुलाचे काम अद्याप हवेतच!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सिंहगड रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या पिलर्सच्या ठिकाणांचे भूगर्भ परीक्षण होऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नाही. काम सुरू करण्यास वाहतूक पोलिसांची एनओसी मिळत नसल्याने काम सुरू करण्यास विलंब होत असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍याने सांगितले आहे. दुसरीकडे कालव्यालगतच्या पर्यायी रस्त्याचेही काम जागेवर थांबल्याने उड्डाणपुलाच्या कामास नेमका केव्हा मुहूर्त मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नर्‍हे, खडकवासला गावांचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून शहरात ये-जा करणार्‍या वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सिंहगड रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे.

डबलडेकर की एकल उड्डाणपूल; महापालिकेचे ठरेना

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मोठा गाजावाजा करून 24 सप्टेंबर रोजी या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनानंतर लगेच काम सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र भूमिपूजन कार्यक्रमातच गडकरी यांनी या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल करण्यासाठी विचार मांडला. त्यानंतर प्रशासनाने दुहेरी उड्डाणपूल शक्य नसल्याचा व तो खर्चिक असल्याचा अहवाल दिल्याने नियोजनानुसार उड्डाणपूल होणार असल्याचे स्पष्ट झाले.

उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कालव्यालगतचा पर्यायी रस्ता पूर्ण केल्यानंतर काम सुरू करण्याची भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली होती. मात्र महापालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था वाहतूक पोलिसांना सांगितल्यानंतर उड्डाणपुलाच्या पिलर्सच्या जागेचे भूगर्भ परीक्षण करण्यास एनओसी दिली. भूगर्भ परीक्षणाचे काम संपले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असताना महापालिका प्रशासनाने उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे एनओसी मागितली. मात्र, अद्याप एनओसी मिळालेली नाही. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा पर्यायी रस्त्याचा व व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केल्याची सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला केव्हा मुहूर्त मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पर्यायी रस्त्याचेही काम जागेवर

सिंहगड रस्त्याला पर्याय ठरणार्‍या उजव्या मुठा कालव्यालगतच्या रस्त्याचे काम गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून रखले आहे. उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाल्यापासून पथ विभागाकडून वारंवार महिनाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, हे काम अद्याप जागेवरच थांबलेले आहे. एक कल्व्हर्ट बांधण्यापलीकडे काहीही झालेले नाही. आता पुन्हा पथ विभागाने एका महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

SCROLL FOR NEXT