वेल्हे: घनदाट जंगल आणि दाट वनराई, गवताळ झुडपांंनी वेढलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांतील सिंहगड-पानशेत परिसरात बिबट्यांची दहशत वाढली आहे. वासरे, शेळ्या-मेंढ्या, कुत्री अशा लहान जनावरांची शिकार बिबटे करीत आहेत. पानशेतजवळील आंबी (ता. हवेली) येथे एका चितळाचा बिबट्याने फडशा पाडला असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंहगड, पानशेतसह या परिसरातील जंगलरानात वनविहार करण्यासाठी गर्दी करीत आहेत, त्यामुळे वन विभागाने पर्यटकांना खबरदारीचे आवाहन केले आहे.
सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दहा तर पानशेत, वरसगावच्या धरण परिसरात दहा असे वीसहून अधिक बिबटे असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे, त्यामुळे सिंहगड घाट रस्त्यावर तसेच आडबाजूच्या रस्त्यावर, जंगलात वाहने उभी करून पर्यटकांनी मौजमजा करू नये, पार्ट्या करू नयेत, असे आवाहन वन विभागाने केले आहे. सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील म्हणाले की, आंबी येथे बिबट्याने चितळाची शिकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दहाहून अधिक बिबटे असल्याने दररोज सायंकाळी सहानंतर गड पर्यटकांना बंद करण्यात येत आहे.
गडाच्या घाट रस्त्यावर तसेच आडबाजूच्या रस्त्यावर जंगलात वाहने उभी करण्यास तसेच वनसफारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आंबीचे सरपंच पोपटराव निवंगुणे हे पहाटे 5 वाजता मोटरसायकलवरून जात असताना त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक धष्टपुष्ट बिबट्या बसल्याचे दिसले. निवंगुणे यांनी गाडीचे हॉर्न जोरजोरात वाजवल्यानंतर बिबट्या शेजारच्या जंगलात निघून गेला. पानशेत वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे म्हणाल्या की, राजगड, पानशेतच्या जंगलात बिबट्यांसह वन्यजीवांचा अधिवास आहे.
त्यामुळे जंगलाशेजारच्या गावात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. जंगलातील वन्यप्राण्यांची बिबटे शिकार करतात, मात्र जंगलापर्यंत खासगी फार्महाऊस, हॉटेलसह मनोरंजन पार्क सुरू झाली आहेत, त्यामुळे बिबटे शिकारीसाठी रानात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या, मेंढ्या, वासरे अशा लहान जनावरांची शिकार करीत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.