Sinhagad West Haveli Drought Pudhari
पुणे

Sinhagad West Haveli Drought: सिंहगड-पश्चिम हवेलीत दुष्काळाने दिवाळीही कडू! ८० टक्क्यांहून अधिक भातपीक वाळले; घरात खाण्यासाठीही तांदूळ नाही

दुष्काळ जाहीर नसल्याने हजारो शेतकरी पाच हजारांच्या दिवाळी मदतीपासून वंचित; जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर, नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: सिंहगड, पश्चिम हवेली तालुक्यात दिवाळी सणावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे शासनाच्या पाच हजार रुपयांच्या दिवाळी मदतीसह इतर लाभापासून तालुक्यातील हजारो शेतकरी वंचित आहेत. दिवाळी सणासाठी फराळही नाही आणि नैवेद्याला नवीन तांदूळही नाही, अशी भयावह स्थिती घेरा सिंहगडसह परिसरातील लहान-मोठ्या वाड्या-वस्त्या, गावांमध्ये आहे.

भातपिकांसह सर्व खरीप पिके वाळून गेल्याने आदिवासी, दलितांसह सर्व शेतकरी, शेतमजूरांना यंदाची दिवाळी कडू झाली आहे. पावसाअभावी नुकसान झालेल्या भात व इतर खरीप पिकांचे हवेलीच्या तहसीलदार अर्चना निकम यांच्या देखरेखीखाली महसूल, कृषी व पंचायत विभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामे केले आहेत. शासनाकडे नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई वाटप करण्यात येणार असल्याचे हवेली तालुका तहसीलदार अर्चना निकम यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात भातपिकांचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहगड, पश्चिम हवेली तालुक्यात दिवाळीच्या सणात घरी खाण्यासाठीही तांदूळ शिल्लक नाही, अशी गंभीर स्थिती आहे.

सिंहगडाच्या दऱ्याखोऱ्यातील खामगाव मावळ, मोगरवाडी, दुरुपदरा, वरदाडे, मालखेड, आंबी, कल्याण, आर्वी, रहाटवडे, कोंढणपूर, अवसरवाडी, खानापूर, सोनापूर, जांभली, मांडवी आदी ठिकाणी ८० टक्क्यांहून अधिक भातपिकांचे नुकसान झाले आहे. भात खाचरात वाळून गेलेली पिकेच शिल्लक आहेत. पिकांत दाणेही नाहीत आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पेंढाही नाही, असे चित्र आहे.

ई-पीक पाहणीत तांत्रिक अडथळे

पश्चिम हवेली-सिंहगड भागातील डोंगर दऱ्याखोऱ्यात ई-पीक पाहणीत तांत्रिक अडथळे निर्माण झाले आहे. त्यावर मात करत प्रशासनाने कसेबसे नुकसानीची पाहणी, पंचनामे केले. अद्याप सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत.

दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा खाण्यासाठीही तांदूळ उपलब्ध नाही आणि बाजारात विक्रीसाठीही धान्य नाही. वर्षभर कसे जगायचे, ही चिंता सतावत आहे. दुष्काळामुळे शेतमजुरीही मिळत नसल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
शिवराम दुधाणे, शेतकरी, खामगाव मावळ
पश्चिम हवेलीसह तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
अर्चना निकम, तहसीलदार, हवेली तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT