वेल्हे: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक सिंहगडावर आज ‘जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या दणदणीत घोषणांत सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तीन भव्य तोफगाड्यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.
अनेक वर्षांपासून उघड्यावर आणि जमिनीला टेकलेल्या, इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सागवानी गाडे बसविण्यात आले. हे तोफगाडे सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी अथक परिश्रमाने गडावर पोहचवले. सकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवघोषणांनी संपूर्ण सिंहगड परिसर भारावून गेला होता.
वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसर, तसेच अमृतेश्वर मंदिरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तोफगाड्यांचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तीन तोफांना गाडे बसविण्याच्या ऐतिहासिक सोहळ्याचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात सह्याद्री किड्स अकादमीच्या 35 चिमुकल्यांनी शिवकालीन शस्त्रखेळाचे सादरीकरण करत उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुढारीच्या दिल्ली आवृत्तीचे प्रतिनिधी श्रीराम जोशी, रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाहक सुधीर थोरात, ज्येष्ठ समाजसेवक रमेश मुळे, शिवाणी कराळे, सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज समीर जाधवराव, रावसाहेब माने, डॉ. नंदकिशोर मते, नितीन वाघ, अजहर शेख, देवेंद्र कांबळे, प्रदीप पायगुडे यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमुख श्रमिक गोजमगुंडे, सुशांत मोकाशी, अजय मोरे, विशाल बेलसरे, प्रसाद भोकरे, गिरीश झगडे आदींनी केले.