पुणे: सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी... दुपारी 12 नंतर वाढलेला मतदानाचा टक्का आणि दुपारी 4 नंतर मोठ्या प्रमाणात लागलेली हजेरी... असे चित्र सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक 32, 33 आणि 34 मध्ये गुरुवारी पहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 33 मध्ये उत्तमनगर परिसरातील महापालिकेच्या शाळेमध्ये मतदारांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 322 मतदान केंद्रे समाविष्ट आहेत. यामध्ये शिवणे, खडकवासला, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, सनसिटी, माणिक बाग आदी ठिकाणांचा समावेश आहे. बहुतांश केंद्रांवर सकाळी 11.30 वाजेपर्यंत 16 टक्के, दुपारी 1.30 वाजेपर्यंत 28 टक्के, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 54.49 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदारांनी घराबाहेर पडणे पसंत केले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, एकूण मतदान केंद्रांपैकी 20 टक्के केंद्रांमध्ये म्हणजेच 64 ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात आले.
प्रभाग क्रमांक 34 (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी)मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालयाच्या बाहेरील मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मतदाराला बोटाला लावण्यात येणारी मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडून त्याला चोप दिला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. मतदान केंद्रावर लिक्विडने शाई पुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून ते लिक्विड जप्त केले. याबाबत पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देण्यात आली.
आकडे काय सांगतात?
मतदान केलेले एकूण मतदार : 1 लाख 57 हजार 141
पुरुष मतदार : 82 हजार 588
महिला मतदार : 74 हजार 553
सकाळी बोलावले, पण ना नाष्टा ना जेवण!
सिंहगड रस्त्यावरील मुरलीधर लायगुडे रुग्णालयासह मनपाच्या अखत्यारीतील विविध रुग्णालयातील नर्स, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजताच हजर राहण्याचे आदेश दिले. क्षेत्रीय कार्यालयाकडून नांदेड, किरकटवाडी, धायरी, डीएसके चौकसह विविध ठिकाणांवरील केंद्रावर कुठे एक कर्मचारी तर कुठे दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. हे कर्मचारी आपल्या आरोग्य कीटसह 7 वाजता हजर होऊनही सायंकाळपर्यंत क्षेत्रीय कार्यालयाकडून त्यांना ना नाष्टा मिळाला ना जेवण. दोन कर्मचारी असलेल्या ठिकाणी आळीपाळीने जेवण करून येता तरी आले, मात्र एकच महिला कर्मचारी असलेल्या केंद्रांवर जेवणासाठी कर्मचाऱ्यांचे खूप हाल झाल्याचे त्यांनी सांगितले.
पिंक आणि आदर्श मतदान केंद्र ठरले लक्षवेधी
या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 35/27 हे आदर्श मतदान केंद्र आणि 35/11 हे पिंक मतदान केंद्र लक्षवेधी ठरले. आदर्श मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पिंक मतदान केंद्रावर 6 महिला कर्मचाऱ्यांनी सर्व जबाबदारी सांभाळली. या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या 463, तर पुरुष मतदारांची संख्या 437 आहे, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी पूनम चणकापूरे यांनी दिली.
रॅम्पअभावी ज्येष्ठांची गैरसोय
प्रभाग क्रमांक 33 मधील डीएसके इंग्लिश मीडियम स्कूल येथे रॅम्पची सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय झाली. धायरी येथे राहणाऱ्या राधिका लिमये या 76 वर्षीय आजींचे नाव कोणत्याही यादीत सापडले नाहीत. मात्र, त्यांचे पती श्रीकृष्ण लिमये यांचे तीन-चार वर्षांपूर्वी निधन होऊनही त्यांचे नाव यादीत होते. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबाबत त्यांचा मुलगा राहुल लिमये यांनी नाराजी व्यक्त केली.