Sinhagad Road Pudhari
पुणे

Sinhagad Road Cleanliness Drive: सिंहगड रस्ता परिसर चकाचक; महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला वेग

विठ्ठलवाडी ते खडकवासला परिसरात विशेष स्वच्छता अभियान; कचरा स्पॉट हटवून सुशोभीकरणावर भर

पुढारी वृत्तसेवा

धायरी: सिंहगड रस्ता परिसर स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. कर्मचारी वेळेत हद्दीत पोहोचून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत असल्याने परिसर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, आनंदनगर, सनसिटी, माणिकबाग, महादेवनगर, वडगाव, धायरी, नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी आणि खडकवासला परिसर चकाचक दिसू लागला आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दैनंदिन स्वच्छता, ग्रुप स्वीपिंग, रस्त्यांच्या कडेला खरडून गवत काढणे, कचरा संकलन तसेच फिडर पॉइंटवरील कचरा नियमित उचलण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही केली जात आहे.

परिसरातील अनेक दिवसांपासून असलेले क्रॉनिक कचरा स्पॉट ओळखून ते निरस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, काही ठिकाणी सुशोभीकरण करून त्यांचे स्वच्छ व आकर्षक ठिकाणांमध्ये रूपांतर केले जात आहे. महापौरांच्या प्रभागातील तुकाईनगर, महादेवनगर, सनसिटी, माणिकबाग तसेच सिंहगड रस्ता परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विशेष स्वच्छता व्यवस्थापन राबविण्यात येत आहे. परिसराच्या स्वच्छतेसाठी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी, सुपरवायझर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार म्हणाले की, क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक आणि मोकदम यांच्याकडून स्वच्छता कामावर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. 'कचरामुक्त परिसर, स्वच्छ रस्ते आणि सुंदर परिसर' या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे हा भाग अधिक स्वच्छ व सुंदर होत आहे.”

सफाई कर्मचारी सकाळी सहा ते साडेसहा वाजल्यापासून रस्त्यावर काम करताना दिसतात. पूर्वीपेक्षा सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने मुख्य रस्त्यांसह छोट्या-मोठ्या गल्ल्यांमध्येही स्वच्छता होत आहे. त्यामुळे परिसर आता अधिक स्वच्छ दिसत आहे. मात्र, परिसराच्या स्वच्छतेसोबतच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे.
युवराज जाधव, रहिवासी, सिंहगड रस्ता परिसर
सिंहगड रस्ता परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छता ही कायमस्वरूपी राबविण्याची प्रक्रिया आहे. नागरिकांमध्ये जनजागृती, स्वच्छता अभियान, रस्त्यावर कचरा पडू नये, यासाठी विविध उपाययोजना तसेच ओला-सुका कचरा वेगळा करून संकलित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रज्ञा पोतदार, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT