Sinhagad Pudhari
पुणे

Sinhagad Tourist Crowd: धुक्यात हरवले किल्ले; सिंहगड-राजगड-तोरण्यावर पर्यटकांची तुफान गर्दी

सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक दाखल; खडकवासला चौपाटी परिसरात वाहतूक कोंडीचा फटका

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जोर रविवारी (दि. २६) सुटीच्या दिवशी ओसरला. रिमझिम पाऊस आणि दाट धुक्याची पर्वा न करता हजारो पर्यटकांनी सिंहगड, राजगड, तोरणागडासह खडकवासला चौपाटी-पानशेत धरण परिसरात गर्दी केली होती. यामुळे खडकवासला धरण चौपाटी व परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका स्थानिकांसह पर्यटकांना बसला.

सिंहगडावर वाहनाने जाणाऱ्या पर्यटकांकडून दिवसभरात १ लाख ६५ हजार रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. सिंहगडावर दिवसभरात ३० हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. गडावर पर्यटकांची २ हजार १०३ दुचाकी, तर ५५६ चारचाकी वाहने आल्याची नोंद झाली. तसेच विक्रेते, खासगी प्रवासी वाहनांचीही संख्या मोठी होती.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिंहगड वन विभागाने टप्प्याटप्प्याने वाहने गडावर सोडली. घाट रस्त्यावरील तसेच वाहनतळावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिंहगड वन विभागाच्या वन परिमंडलाधिकारी वैशाली हाडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुरेश बरले, संदीप कोळी यांच्यासह सिंहगड वन व्यवस्थापन समितीचे ३५ सुरक्षारक्षक धावपळ करीत होते.

राजगड, तोरणागड तसेच पानशेत वरसगाव धरण परिसरात पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती. राजगड किल्ला दाट धुक्यात हरवून गेला होता. रिमझिम पाऊस आणि थंडगार वारे वाहत होते. गड व परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरव्या वनराईने बहरल्या आहेत.

खळखळ वाहणाऱ्या डोंगरकड्यातून पाण्याचे फवारे उडत आहेत. निसर्गाचे विलोभनीय दृश्य पर्यटक मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत होते. राजगडावर १० ते १२ हजारांवर, तर तोरणागडावर ३ हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. राजगड किल्ल्यावर रविवारी पाऊस पडत असतानाही पर्यटकांची झालेली गर्दी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT