

कात्रज: गेल्या अनेक वर्षांपासून भूसंपादन प्रक्रियेमुळे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाच्या कामाला आता गती मिळाली आहे. रस्तारुंदीकरणाच्या अनुषंगाने सेवा रस्ते, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या तसेच ड्रेनेजलाईन टाकण्याची कामे वेगाने सुरू झाली असून, या कामांची पाहणी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
दरम्यान, रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या मुख्य ओव्हरहेड विद्युत वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर हटविण्याच्या कामालाही मंजुरी मिळाल्याने या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याचे पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीकरण करण्यात येत असून, यामध्ये ३२ मीटरचा मुख्य रस्ता आणि दोन्ही बाजूंना एकूण ९ मीटरचे सेवा रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.
त्यामुळे भविष्यात या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सध्या सेवा रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. राजस सोसायटी ते शत्रुंजय मंदिर या सुमारे १२०० मीटर लांबीच्या प्रस्तावित सेवा रस्त्यापैकी सुमारे ३५० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही टप्प्याटप्प्याने वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रस्तारुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे काढणे तसेच आवश्यक ठिकाणी त्यांचे पुनर्रोपण करण्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये तसेच परिसरातील सांडपाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, यासाठी सुमारे दहा ठिकाणी पावसाळी पाण्याच्या वाहिन्या आणि ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाल्याने गेली अनेक वर्षे अपघात व वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाच्या कामात सेवा रस्ते तसेच पावसाळी आणि ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. माउलीनगर येथे सेवा रस्ते सलग ठेवून माउलीनगर, महादेवनगर, शेलार मळा व उत्कर्ष सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी वाहतूक नियोजन पथ विभागाकडून करण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण आणि गतीने कामे मार्गी लावली जात आहेत.
धनंजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, पथ विभाग महापालिका
कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणात येणाऱ्या विद्युत विभागाच्या ओव्हरहेड लाईन व ट्रान्सफॉर्मर हटविण्यासाठी १.३ टक्के मंजूर इस्टिमेट देण्यात आले आहे. महापालिकेने आवश्यक रक्कम भरल्यानंतर काम सुरू करता येईल. महावितरणकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
ज्ञानेश्वर पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी