Sinhagad and Rajgad forts full of tourists
खडकवासला: रक्षाबंधनाची सुटी (दि. 9) आणि त्यानंतर रविवार (दि. 10) अशा सलग सुट्यांचा पर्यटकांनी मनमुराद आनंद घेतला. पावसाने उघडीप दिल्याने सिंहगड किल्ला रविवारी अक्षरशः हाउसफुल्ल झाला होता. राजगड, तोरणागड, पानशेत व खडकवासला धरण परिसरातही दिवसभर पर्यटकांची प्रचंड वर्दळ होती.
सिंहगडावर सकाळपासूनच राज्यासह देशाच्या विविध भागांतून पर्यटकांची गर्दी होऊ लागली. दुपारी बारापर्यंत गडावरील वाहनतळ पूर्ण भरला. जागा नसल्याने घाटरस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी, सिंहगड घाटरस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती हाताळण्यासाठी कोंढणपूर फाट्यावर वाहतूक थांबवावी लागली, त्यामुळे अनेक पर्यटकांना वाहनातच ताटकळत बसावे लागले. गर्दीमुळे शेकडो पर्यटकांना माघारी फिरावे लागले.
सिंहगडावर दिवसभरात तब्बल 20 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले की, गडावर दिवसभर चार-पाचवेळा वाहतूक थांबवावी लागली. गडावरील गर्दी कमी झाल्यानंतरच नव्या वाहनांना प्रवेश देण्यात आला. रविवारी सिंहगडावर 1,063 दुचाकी व 483 चारचाकी वाहने गेली. सिंहगड वनसंरक्षण समितीने पर्यटकांकडून 1 लाख 1 हजार 850 रुपये इतका टोल वसूल केला.
राजगड किल्ल्यावर 3 हजार पर्यटकांची हजेरी होती. दिवसभराची उघडीप संध्याकाळी पावसात बदलली, त्यामुळे खाली जाण्यासाठी पर्यटकांची धावपळ उडाली. खडकवासला चौपाटी व पानशेत परिसरातही गर्दी उसळली होती.
दुपारी चार वाजल्यानंतर पुण्याकडे जाणार्या वाहनांची संख्या वाढल्याने पुणे-पानशेत रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, अधिकारी, जवान तसेच खडकवासला जलसंपदा विभागाचे रक्षक यांचीधावपळ झाली.