सिंहगड-पानशेत परिसरात बिबट्यांचा उद्रेक आणि रानडुकरांचा धुमाकूळ Pudhari
पुणे

Leopard Boar Crop Damage: सिंहगड-पानशेत परिसरात बिबट्यांचा उद्रेक आणि रानडुकरांचा धुमाकूळ; शेतकरी हैराण

भात, भुईमूग, ज्वारीसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान; बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांची शेतात जाण्याची भीती वाढली

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला : सिंहगड-पानशेत भागात रानडुकरांच्या कळपांनी धुमाकूळ घातला असून, बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे खानापूर, सांबरेवाडी, थोपटेवाडी, मणेरवाडी, सोनापूर, मोगरवाडी आदी ठिकाणी भात, भुईमूग आदी पिकांची काढणी ठप्प झाली आहे.(Latest Pune News)

सिंहगड, पानशेतच्या जंगलात ठाण मांडून बसलेले रानडुकरांचे आठ ते दहा कळप रातोरात भुईमूग, भात पिकांसह ज्वारी, गहू अशा रब्बी पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सर्वात गंभीर स्थिती खडकवासला धरणाच्या तीरावरील खानापूरमध्ये अक्षय रघुनाथ जावळकर, राहुल शिवाजी जावळकर, नारायण जावळकर, विठ्ठल जावळकर आदी शेतकऱ्यांची ज्वारीची पिके रानडुकरांनी फस्त केली आहेत. त्या आधी या शेतातील भुईमूगाची पिके जमीनदोस्त केली होती.

धरण तीरावरील शेतात बिबट्यांच्या पायाचे ठसे उमटले आहेत. त्यामुळे शेतकरी दुपारनंतरच कसेबसे एकमेकांच्या आधाराने शेतात जात आहेत.

पानशेत भागात गेल्या आठ दिवसांत आठहून अधिक शेळ्या-मेंढ्या, वासरांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागात भात, नाचणी, वरई पिकांची कापणी खोळंबली असल्याचे टेकपोळेच्या सरपंच मंगल बामगुडे यांनी सांगितले.

रातोरात पिकांची नासाडी

मोगरवाडीतील लक्ष्मण हरिभाऊ दारवटकर यांचे जवळपास एक एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक रानडुकरांच्या कळपाने फस्त केले. जंगलातील रानडुकरांचे कळप रातोरात शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहेत.

सिंहगड पायथ्याच्या खानापूर, सांबरेवाडी, मोरदरी, दुरुपदरा, मणेरवाडी, थोपटेवाडी, घेरा सिंहगड, खामगाव मावळ, मोगरवाडी तसेच आंबी, मालखेड, सोनापूर आदी ठिकाणी आठ ते दहा रानडुकरांचे कळप गेल्या दोन महिन्यांपासून पिकांची नासाडी करत आहेत. वन विभागाकडून शासकीय मदत मिळण्यासाठी किचकट कागदपत्रे द्यावी लागत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.
अक्षय जावळकर, शेतकरी, खानापूर
पिकांचे नुकसान केल्यास शासन आदेशानुसार संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच भरपाईचा प्रस्ताव सादर केला जात आहे. अनेक शेतकरी मोघम नावे देत आहेत. त्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतंत्र अर्ज, आवश्यक कागदपत्रे सादर करावी, तरच नुकसान भरपाई शासनाकडून मिळते.
समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT