Sinhagad Pudhari
पुणे

Sinhagad Fort Security: सिंहगडावर हुल्लडबाजांना लगाम; ८ पोलिस जवानांसह होमगार्ड तैनात, सीसीटीव्हीचा ‘वॉच’

महिला, ज्येष्ठ पर्यटकांशी गैरवर्तन आणि मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई; शनिवार-रविवारी कडेकोट बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: सिंहगड किल्ल्यावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी वन, पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. गडाच्या पुणे दरवाजासह वाहनतळ व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच, हवेली पोलिसांनी एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस जवान, होमगार्ड तैनात केले आहेत. याशिवाय, वन विभागाच्या वतीने वन कर्मचाऱ्यांसह सुरक्षारक्षक ठिकठिकाणी सज्ज केले आहेत.

हुल्लडबाज पर्यटक, तथाकथित दुर्गप्रेमी टोळकी गडावर धुमाकूळ घालत आहेत. कायदा हातात घेऊन हाफपँट घालणाऱ्या लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ पर्यटकांना मारहाण करणे, महिला, मुलींशी असभ्य वर्तन करणे, ट्रिपल सीट दुचाकीवर प्रवास, मद्यपान करून सिंहगड घाटरस्त्यावर बेभान गाड्या चालवणे आदी प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील सुरक्षेबाबत प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे.

अलिकडच्या काळात मारहाण, हाणामाऱ्या, महिलांशी असभ्य वर्तन आदी प्रकार वाढल्याने पर्यटकांत असुरक्षितता निर्माण झाली आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभाग व पोलिस प्रशासन स्थानिक घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती व ग्रामस्थांच्या सहभागातून गडावर कडेकोट बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अत्यावश्यक मदतीसाठी यंत्रणा उभी करणार आहे.

हवेली पोलिसांच्या वतीने गडाच्या पायथ्याला डोणजे, गोळेवाडी नाका, कोंढणपूर फाटा नाका, वाहनतळावर वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. तेथे मद्यपींसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकारी, पोलिस जवानांसह होमगार्ड तैनात केले आहेत. शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी गडावर पोलिस, वन विभागासह सुरक्षारक्षक जागता पहारा देणार आहेत. शनिवारी (दि. २२) त्याची रंगीत तालीम घेण्यात आली.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे म्हणाले की, गडावरील सुरक्षाव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. गैरकृत्य, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई झाल्यास अशा प्रकारांना पायबंद बसेल.

गडाचे पावित्र्य राखण्याची अपेक्षा

कोंढणपूर फाटा नाका, गोळेवाडी नाका या ठिकाणी वन विभागाने याआधीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच, घाटरस्त्यावर २४ तास सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. वाहनतळ, घाटरस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षारक्षक या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असतात. मात्र, गडावर पुरेशा प्रमाणात सुरक्षारक्षक नसल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उन्मत पर्यटक, टोळकी राजरोसपणे गैरकृत्य करीत आहेत. गडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची अपेक्षा पर्यटक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सिंहगड किल्ला हे केवळ पर्यटनस्थळ नाही. सिंहगडासाठी नरवीर तानाजी मालुसरे व वीर मावळ्यांनी राष्ट्ररक्षणासाठी बलिदान दिले. त्यांचा जिवंत वारसा असलेले सिंहगड ऐतिहासिक स्थळ आहे. त्यामुळे गडावर महिला मुलींशी असभ्य वर्तन, हुल्लडबाजी, निष्पाप पर्यटकांना मारहाण, असे प्रकार सहन केले जाणार नाहीत‌. असभ्य वर्तन, गैरकृत्य करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
राजेश रामघरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT