

पुणे: ऐतिहासिक वाड्यांचा वारसा जपणाऱ्या पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये याच वाड्यांनी आता नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केला आहे. गेल्या पाच वर्षांत वाडे, घरे आणि भिंती कोसळण्याच्या तब्बल ५२ घटना घडून त्यात १४ नागरिक जखमी झाले. शहरातील ४,६८७ मिळकतींच्या सर्वेक्षणात तब्बल ३०९ मिळकती 'सी-१' अर्थात अतिधोकादायक आढळूनही महापालिकेची कारवाई नोटिसा, जाहीर प्रकटन आणि पोलिसांना पत्रे यापलिकडे सरकलेली दिसत नाही.
विशेष म्हणजे, या दुर्घटनांमध्ये झालेल्या वित्तहानीची नोंदही महापालिकेकडे नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल पेठवासीयांकडून उपस्थित होत आहे. महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने पेठ भागातील ४,६८७ मिळकतींचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ३०९ मिळकती अतिधोकादायक श्रेणीत आढळल्या. गेल्या पाच वर्षांत ३०५ वाडे उतरविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २८४ वाडे उतरविण्यात आले; मात्र २१ वाड्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
रहिवाशांचा विरोध असल्याचे कारण देत पोलिसांना पत्रे आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहीर प्रकटन करण्यापुरतीच कारवाई मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये चार, २०२२ मध्ये आठ, २०२३ मध्ये दहा, २०२४ मध्ये सात, २०२५ मध्ये १३ आणि २०२६ मध्ये जुलैअखेर दहा, अशा एकूण ५२ दुर्घटना घडल्या. या घटनांमध्ये १४ नागरिक जखमी झाले. मोठी जीवितहानी झाली नसली तरी धोकादायक वास्तूंची संख्या पाहता प्रशासनाला मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे २०२१ ते २०२६ या कालावधीतील प्रत्येक वर्षाच्या दुर्घटनांच्या आकडेवारीत वित्तहानीबाबत 'समजू शकली नाही' असे नमूद आहे. त्यामुळे दुर्घटनेनंतर झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीची नोंद ठेवण्याची यंत्रणाही सक्षम नसल्याचे स्पष्ट होते.
नियम काय सांगतो?
धोकादायक इमारतींची सी-१, सी-२ए, सी-२बी आणि सी-३ अशी वर्गवारी केली जाते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६५ नुसार इमारत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मालकाची आहे. धोकादायक भाग न उतरवल्यास महापालिकेला कारवाई करता येते.
वित्तहानीची नोंदच नाही!
२०२१ ते २०२६ या कालावधीत वाडे, घरे आणि भिंती कोसळण्याच्या ५२ घटना घडल्या. मात्र, प्रत्येक वर्षाच्या आकडेवारीत वित्तहानीबाबत 'समजू शकली नाही' असे नमूद करण्यात आले आहे. दुर्घटनांनंतर झालेल्या आर्थिक नुकसानीची नोंद ठेवण्याबाबत महापालिकेच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाच वर्षांत ५२ दुर्घटना
२०२१: ४
२०२२: ८
२०२३: १०
२०२४: ७
२०२५: १३
२०२६: (जुलैअखेर) १०
एकूण: ५२
जखमी: १४
धोक्याची आकडेवारी
४,६८७: सर्वेक्षण केलेल्या मिळकती
३०९: 'सी-१' अति-धोकादायक मिळकती
३०५: कारवाईचे नियोजन केलेले वाडे
२८४: उतरविण्यात आलेले वाडे
२१: अद्याप कारवाई बाकी