Theatre Project Delay Pudhari
पुणे

Pune Theatre Project Delay: सिंहगड रस्ता नाट्यगृह प्रकल्पाला नऊ वर्षे; पूर्णत्व कधी?

वडगाव बुद्रुक येथील काम रखडले; नागरिकांचा संताप वाढला

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद पानसरे

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील गोयलगंगा सोसायटीसमोर डीपी रस्त्यालगत गेल्या नऊ वर्षांपासून नाट्यगृह आणि कलामंदिराचे बांधकाम सुरू आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी हे काम वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. सध्याच्या आयुक्तांनी या कामाची नुकतीच पाहणी करून वर्षभरात या नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे हे नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास येणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील नाट्य आणि कलाप्रेमींसाठी जानेवारी 2017 मध्ये या नाट्यगृहाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या या प्रकल्पाचे काँक्रीटचे काम पूर्ण झाले आहे. बाकीचे इतर कामे अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे. विद्युत, फायर फायटिंग, प्लंबिंग, इंटेरिअर डिझाईन, सीमाभिंत आदी कामे अद्यापी बाकी आहेत.

या नाट्यगृहात 750 प्रेक्षकांची आसनव्यवस्था, भव्य कलादालन, आर्ट गॅलरी आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील पहिलेच भारतीय शास्त्रीय संगीत महाविद्यालय येथे सुरू करण्यात येणार असल्यामुळे साहित्य, कला व नाट्यप्रेमींना या नाट्यगृहाबाबत उत्सुकता आहे. तसेच कलाकारांसाठी ग््राीन रूमची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जुना वार्ड क्रमांक 55 मध्ये होता.

परंतु महापालिकेची वार्डरचना बदल्यानंतर हा प्रकल्प प्रभाग क्रमांक 34 मध्ये आला होता. त्यानंतर तो प्रभाग क्र 35 मध्ये आला आहे. हा प्रकल्प 2020 पूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु अद्यापही तो पूर्णत्वास आला नाही. यामुळे नाट्यगृहाची अजून किती वर्षे प्रतीक्षा करायची, असा प्रश्न नाट्य व कला रसिकांना उपस्थित केला जात आहे.

महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी साहित्य, कला व नाट्यप्रेमींसाठी लवकरात लवकर या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा नागरिकांकडून उपस्थित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हाती घेतलेला महापालिकेचा हा पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी होत आहे.

माहिती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ

महापालिकेच्या भवन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रकल्प पूर्ण होण्यास नेमका किती कालावधी लागणार? यंदाच्या बजेटमध्ये किती निधीची तरतूद केली आहे? याबाबत विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

सिंहगड रस्ता परिसर हा पुणे शहराचे पर्यटनस्थळ मानले जाते. अनेक नाट्य आणि कलाप्रेमी, साहित्यिक आणि कलावंत या भागात राहतात. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नाट्यप्रेमींसाठी या नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
भरत भुरट, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT