जळोची: एसटी भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात प्रशासन हतबल ठरले असून गत वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन प्रवासी संख्येत तीन लाखांनी घट झाली आहे. बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून तत्काळ श्वेतपत्रिका काढून उत्पन्न वाढीसाठी व कर्मचार्यांच्या थकीत रक्कमा देण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पाठविण्यात आले असून त्यात महामंडळाची एकूण थकीत देणी व कर्मचार्यांची एकूण थकीत याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एकूण थकीत देणी सात हजार कोटी रुपयांच्यावर गेली असून प्रलंबित थकीत रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे. (Latest Pune News)
एसटीने हल्लीच 14.95 टक्के इतकी भाडेवाढ केली असली तरी गेल्या वर्षाची मार्च महिन्यातील दिनांक 1 मार्च ते 18 मार्चची एकूण आकडेवारी व त्याच कालावधीतील या वर्षीची आकडेवारी तपासली तर भाडेवाढीच्या नंतर ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांप्रमाणे दिवसांचे सरासरी उत्पन्न 31 कोटी 74 लाख इतके यायला हवे होते.
पण प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन सरासरी 27 कोटी 66 लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी याच काळात प्रवासी संख्या 41 लाख इतकी होती. त्यात प्रतिदिन 3 लाखांनी घट झाली असून ती 38 लाखांवर आली आहे. अजूनही दिवसाला साधारण 4 कोटी रुपये इतकी रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.
याचाच अर्थ भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे एकंदर आर्थिक परिस्थितीचा विचार करता एकूण थकीत रक्कम व थकीत देणी ही देण्यासाठी निव्वळ महामंडळ स्थरावर काहीही साध्य होणार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, याची पूर्णतः खात्री झाली आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून शासनानेच यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही बरगे यांनी म्हटले आहे.