Dagdusheth Halwai Ganpati Pudhari
पुणे

Dagdusheth Halwai Ganpati Tourism Status: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

राज्य सरकारच्या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन आणि परिसर विकासाला चालना; भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील ‌‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट‌’ला राज्य सरकारकडून ‌‘अ‌’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि परिसर विकासाला चालना मिळणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनातही मोठे योगदान आहे. रोज देश-विदेशातून हजारो भाविक येथील मंदिरात दर्शनासाठी येतात. ‌‘अ‌’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आसपासच्या परिसराचा विकास आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सरकारकडून ट्रस्टला विशेष निधी उपलब्ध होणार आहे.

या निधीच्या माध्यमातून भाविकांसाठी दर्शन रांग व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्वच्छतागृहे, भक्तनिवास आणि सुरक्षेच्या अत्याधुनिक उपाययोजनांसारख्या पायाभूत सुविधा उभारणे शक्य होईल. यामुळे पुण्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. यापूर्वी मंदिराला जिल्हा नियोजन समितीकडून ‌‘क‌’ वर्ग दर्जा प्राप्त होता. आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या मंदिरास ‌‘अ‌’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‌‘अ‌’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आता जागतिक स्तरावर पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यास आणखी मदत होणार आहे. तसेच, 20 ते 25 हजार रोजगारनिर्मिती या माध्यमातून पुढील पाच वर्षात होणार आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचा आनंद आहे.
सुनील रासने, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
तीर्थक्षेत्राचा ‌‘अ‌’ दर्जा मिळवणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे पहिलेच गणेशोत्सव मंडळ आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मागणीला पाठिंबा देत, ती पूर्ण केली, ही आनंदाची गोष्ट आहे.
हेमंत रासने, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT