Lonavala Cab Driver Assault Video Viral: लोणावळा येथे पर्यटकांना सोडविण्यासाठी आलेला एक ओला/उबेर कंपनीचा टॅक्सी चालक वरसोली टोलनाका येथे एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबला असता, तू येथे का आला, असे म्हणत व शिवीगाळ करत एका स्थानिक टॅक्सीचालकाने त्याला मारहाण करत त्याची गाडी दगडाने फोडली.
चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील त्याने तयार केला आहे. असे या स्वयंघोषित भाईच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकसई भागात राहणारा एक टॅक्सीचालक रोहित रामकिसन गुप्ता याने सदर टॅक्सी चालकाला मारहाण करत त्याच्या टॅक्सीवर दगड मारत त्याची टॅक्सी फोडली. याप्रकरणी तात्याराव भिकन सपकाळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा पोलिस करत आहेत.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर एकाने प्रतिक्रिया दिली की, 'एवढी दादागिरी कशी चालते पुण्यात? पोलिसांचा वचक आहे की नाही ? प्रत्येक दिवस काही न काही बातमी येत असते पुण्याच्या बाबतीत. परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्या अगोदर लक्ष द्या'
दुसऱ्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली की, 'लोणावळा हे मुंबईकर पुणेकर यांच्यासाठी पर्यटनासाठीचे आवडीचे ठिकाण आहे अशा घटनांमुळे पर्यटन स्थळे बदनाम होतात व पर्यटन आधारित अर्थव्यवस्था बाधित होते तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा घटनांमुळे टॅक्सी चालक व पर्यटक या भागात जाणार नाहीत'
तर आणखी एकाने प्रतिक्रिया दिली की, ''अवघड झाले आहे पुणे जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला झाला आहे असे दररोज भरदिवसा प्राणघातक हल्ले होत आहेत, पोलीस प्रशासनाने जसे नाशिक जिल्ह्यात काम सुरू केले आहे तसेच पुणे जिल्ह्यात सुद्धा काम करणे अपेक्षित आहे''