खेड शिवापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रामुख्याने महिलांना विविध पक्षाच्या इच्छुकांकडून देवदर्शन व कोकण सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. या वेळी महिलांमध्ये ‘जिकडे घेऊन जातील तिकडे जाऊ, नंतर बटण कोणाचे दाबायचे ते बघू’ अशी चर्चा शिवगंगा खोऱ्यातील काही गावांमधून ऐकायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर खेडशिवापूर परिसरातील काही इच्छुक उमेदवार कोकण दर्शन व देवदर्शनाच्या सहलीचे आयोजन करीत आहेत. मतदाररुपी आशीर्वाद मिळविण्यासाठी मुख्यतः महिलांसाठी या सहलीचे आयोजन केले जात आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाचे समर्थन करणारी महिला असेल तरी त्या महिलेला देखील या सहलीचे आमंत्रण देण्यात येत आहे. त्यामुळे सहलीला गेलेल्या महिला उत्तरार्धात किंबहुना निवडणुकीत कोणाचे बटण दाबून कोणता उमेदवार निवडून आणतात हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.
दरम्यान सोशल मीडियावरून सहलीचे दृश्य पाहायला मिळत असून त्यामध्ये महिलांची प्रतिक्रिया घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या सोशल मीडियाची चर्चा महिलांमध्ये सुरू आहे; मात्र महिलांच्या चर्चेमधून ’जिकडे घेऊन जातील तिकडे जाऊ, नंतर बटण कोणाचे दाबायचे ते बघू’ या चारोळ्यासारखी वाक्ये ऐकायला मिळत आहेत.
मुळात खेडशिवापूर परिसरातील गावांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत, तर काही गावात विकासकामे झाली नसल्याने तेथे नाराजीचा सूर ऐकू येत आहे. गेल्या पाच वर्षांत काहींनी कोणत्याही विकासकामात सहभाग घेतला नाही; मात्र केवळ निवडणूक लढवायची म्हणून सहलीचे आयोजन करून महिलांचे मतदान आपल्याला मिळावे, अशी भुरळ सहलीच्या माध्यमातून घातली जात असल्याचे ऐकायला मिळत आहे.
खरं तर निवडणूक आली की, अशाप्रकारचे आमिष अनेक जण दाखवत असतात; मात्र महिलांनी या भुरळीला भीक न घालता विकास कामालाच पसंती द्यावी, अशी चर्चा सज्ञान असणाऱ्या महिलांकडून ऐकायला मिळत आहे. अशा प्रकारचे आमिष दाखवून उमेदवार मतदाररुपी आशीर्वाद मिळवतात आणि भविष्यात होणाऱ्या विकासकामांना खीळ बसते. त्यामुळे महिलांनी जागे होण्याची आवश्यकता आहे. ’जिकडे जायचे तिकडे जा, मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका’ असे नाव न सांगण्याच्या अटीवर काही महिलांनीच सांगितले.