शिवणे-खडकवासला परिसरातील नागरिकांचा प्रश्न — कागदावरच विकास, प्रत्यक्षात वानवा! Pudhari
पुणे

PMC Elections Pune: शिवणे-खडकवासला परिसरातील नागरिकांचा प्रश्न — कागदावरच विकास, प्रत्यक्षात वानवा!

प्रभाग क्रमांक ३३ मधील शिवणे, धायरी, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर परिसरात पाणीटंचाई, अशुद्ध पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा आणि आरोग्यसेवेचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

शिवणे, खडकवासला, धायरी, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर उर्वरित, या प्रभाग क्रमांक ३३ मध्ये सोसायट्या, गावठाणासह कष्टकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या गावांतील असमान, अशुद्ध पाणीपुरवठा तसेच नांदेडमधील विहिरीतून अशुद्ध पाणीपुरवठा होऊन या भागात जीबीएस या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. उत्तमनगर, शिवणे भागात रस्त्यांवरच भाजी मंडई भरत आहे. ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणे, ड्रेनेजलाइन, पावसाळी वाहिन्या, आरोग्य सुविधा अशा मूलभूत सुविधांची या भागात वानवा आहे.(Latest Pune News)

कागदावरचा विकास प्रत्यक्षात येणार कधी ?

महापालिकेची २०१७ ची निवडणूक झाल्यानंतर या प्रभागात येणारी जवळपास नऊ गावे पालिकेत समाविष्ट झाली. त्यामुळे पूर्णक्षमतेने लोकप्रतिनिधी न मिळाल्याने या भागाला विकासकार्मापासून वंचित राहावे लागले आहे. महापालिका प्रशासनाकडून समाविष्ट गावांचा विकास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विकास प्रत्यक्षात काही दिसत नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रभागाची लोकसंख्या जवळपास तीन लाख आह. एकट्या उर्वरित धायरीची लोकसंख्या साठ हजार, नांदेड गावची चाळीस हजार, तर शिवणे, खडकवासलाची प्रत्येकी लोकसंख्या तीस हजारांहून अधिक झाली आहे. नांदोशी वगळता इतर सर्व गावांत सोसायट्या, लोकवस्त्यांचे दाट जाळे निर्माण झाले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), नांदेड सिटीसारखे मोठे निवासी प्रकल्प, खडकवासला धरण, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र, अशा महत्त्वाच्या संस्था, प्रकल्प या प्रभागात आहेत. नामांकित शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालयांचेही मोठे जाळे निर्माण झाले आहे. धायरी येथील शिवकालीन खंडोबा मंदिर, श्री धारेश्वर शंभू महादेव मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर तसेच खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी,सणसवाडी, नांदेड, कोंढवे धावडे येथे शिवकालीन मंदिरे, वास्तू आहेत. खडकवासला धरण चौपाटी अशी पर्यटनस्थळे आहेत.

खडकवासला धरण जवळ असूनही या प्रभागातील किरकटवाडी, कोल्हेवाडी, नांदेड, धायरी येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. लोकसंख्या वाढल्याने जुन्या जलयोजनांचे पाणी रहिवाशांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे विकतच्या टँकरवर वीस ते पंचवीस टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. प्रचंड लोकसंख्येच्या या प्रभागात बहुतेक ठिकाणी जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना नाहीत. त्यामुळे अशुद्ध पाण्यावर लाखो नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.

गेल्या वर्षी नांदेड, खडकवासला परिसरात जीबीएससारख्या गंभीर रोगाची साथ पसरली होती. या साथीने सहा जणांचे बळी घेतले असून, असे असले तरी अद्याप एकाही गावात सुधारित शुद्ध पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या नाहीत. अशीच गंभीर स्थिती ड्रेनेजलाइनची आहे. ग्रामपंचायत गावठाण, काळापासून सोसायट्या लोकवस्त्यांतील मैलापाणी, सांडपाणी, कंपन्या उद्योगांचे विषारी पाणी प्रक्रिया न करता थेट ओढ्या-नाल्यांतून मुठा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे जलप्रदूषण होत आहे.

जुन्या ड्रेनेजलाइन अपुऱ्या पडत आहेत. त्यातून गळती होऊन मैलापाणी थेट रस्त्यांवरून नागरिकांच्या घरादारांत शिरत आहे. धायरी रायकरमळा, नांदेड, कोल्हेवाडी आदी ठिकाणी मैलापाण्याची समस्या बाराही महिने असते. पावसाळी वाहन्या नसल्याने तसेच ओढे-नाल्यांचे प्रवाह अतिक्रमण करून बुजविण्यात आल्याने शिवणे, खडकवासला, किरकटवाडी आदी ठिकाणी अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होत आहे.

परिसरात प्राथमिक शाळांच्या इमारतींची स्थितीही गंभीर आहे. महापालिकेत समावेश झाल्याने जिल्हा परिषदेने शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, नवीन बांधकामे केली नाहीत. महापालिकेनेही दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीत बसून नांदेड येथील मनपा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. किरकटवाडी प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या छतातून गळती सुरू आहे. शिवणे येथील शाळेची इमारतही जीर्ण झाली आहे.

प्रभागात या भागांचा समावेश खडकवासला, शिवणे, उर्वरित धायरी, नांदेड, किरकटवाडी, कोंढवे धावडे नांदोशी, सणसनगर, उत्तमनगर, कोपरे

"जीबीएस'ची पसरली होती साथ

महापालिकेत समावेश होऊनही गेल्या आठ-दहा वर्षांपासून या प्रभागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सेवा पुरवली जात आहे. महापालिकेची आरोग्यसेवा तोकडी पडत आहे. गरोदर माता, बालकांचे नियमित लसीकरणही कोलमडले आहे. जीबीएस रोगाची लागण झाली त्या वेळी पाणीपुरवठा, सरकारी आरोग्यसेवेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला. विकास आराखडा मंजूर करून रस्ते, ड्रेनेजलाइन, सुधारित जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना, ओढ्या-नाल्यांचे रुंदीकरण, साकव, संरक्षण कठडे आदी कामे करणे गरजेचे आहे.

वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच

विकास आराखडा मंजूर नसल्याने प्रभागातील एकाही गावात नवीन रस्त्याचे काम झाले नाही. पर्यायी रस्ते नसल्याने मुख्य सिंहगड रस्ता, एनडीए-बहुली रस्ता, पानशेत रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मुठा नदीवरील शिवणे व नांदेड गावाला जोडणाऱ्या इंग्रज राजवटीतील पुलाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पावसाळ्यात खडकवासला धरणातून जादा पाणी सोडल्यानंतर हा पूल पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना दूर अंतरावरून वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. अशीच स्थिती किरकटवाडी-नांदोशी रस्ता, धायरी, नांदेड, शिवणे आदी ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची आहे.

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नांदेड शिवणे पूल, अंतर्गत ड्रेनेजलाइन, आरोग्यवर्धिनी केंद्र आदी विकासकामे मार्गी लावली आहेत.
अनिता इंगळे, माजी सदस्या, जिल्हा परिषद
कोंढवे धावडेचा सरपंच असताना पाणीपुरवठा योजनांसह विविध विकासकामांना चालना दिली. हवेली पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागात प्रलंबित नागरी प्रश्न सोडविले.
बाळासाहेब मोकाशी, माजी सभापती, हवेली तालुका पंचायत समिती
महापालिकेत समावेश होऊनही गावात फारशा सुधारणा झाल्या नाहीत. उलट खराब व अरुंद रस्त्यामुळे गावात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
तुषार धुमाळ, रहिवासी, किरकटवाडी
शिवणे, उर्वरित धायरीसह प्रभागातील गावांत रस्ते, पूल, पदपथाचे विद्युतीकरण, पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवीन जलवाहिन्या आदी कामे करण्यात आली आहेत. उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार केला आहे.
अश्विनी पोकळे, माजी नगरसेविका
ग्रामपंचायत काळात प्रशासन नागरिकांच्या दारात पोहचत होते. मात्र, आता जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठीही हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
संदीप चव्हाण, माजी उपसरपंच, धायरी
खडकवासला धरण चौपाटीवर सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी होत असल्याने पार्किंगच्या सुविधेअभावी वाहतूक कोंडी होत आहे. त्यात रुग्णवाहिका अडकून वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत.
किरण मते, रहिवासी, खडकवासला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT