ST Bus Stand Pudhari
पुणे

Pune Shivajinagar Bus Port: शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा होणार अत्याधुनिक बस पोर्टमध्ये विकास

एसटी महामंडळ आणि महामेट्रोमध्ये सामंजस्य करार; १५,४०० चौ. मीटर जागेचा संयुक्त विकास, मेट्रो-रेल्वेशी थेट जोडणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा देण्यासाठी शिवाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्टमध्ये विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्यामध्ये संयुक्त विकासाचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला.

या प्रकल्पामुळे पुणेकरांसह राज्यभरातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि एकात्मिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवाजीनगर मेट्रोस्थानक, रेल्वेस्थानक आणि एसटी बसस्थानक यांची प्रभावी सांगड घालून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान करण्याचे उद्दिष्ट आहे.

१५,४०० चौ. मीटर जागेचा संयुक्त विकास

शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या १५,४०० चौरस मीटर जागेवर हा विकास प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यापैकी सुमारे ४९०० चौरस मीटर जागेवर महामेट्रोने शिवाजीनगर मेट्रो स्थानक उभारले आहे. उर्वरित १०,५०० चौरस मीटर जागेवर बस पोर्ट आणि व्यावसायिक विकासाची योजना आखण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी महामेट्रोची 'प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर हा विकास करण्यात येणार असून, प्रकल्पाची व्यवहार्यता, आर्थिक मूल्यांकन आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विकासाचे स्वरूप निश्चित केले जाईल.

आधुनिक बस पोर्ट आणि व्यावसायिक सुविधा

प्रस्तावित विकासामध्ये एसटी बस टर्मिनस, बस आगार, बस पार्किंग, आवश्यक व्यावसायिक आणि कार्यालयीन जागा तसेच प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधांचा समावेश असेल. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी करून बहुविध वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिक केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामासाठी सध्याचे एसटी बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात वाकडेवाडी येथील आरे डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आलेले आहे. या तात्पुरत्या बसस्थानकासाठी आवश्यक मूलभूत सुविधा महामेट्रोने उपलब्ध करून दिली आहे. शिवाजीनगर येथे नव्या बस टर्मिनसची उभारणी पूर्ण झाल्यानंतर एसटी बसस्थानक पुन्हा मूळ जागी सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT