Shivendraraje Bhosale Pudhari
पुणे

Chhatrapati Shivaji Maharaj Management Skills: शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक: शिवेंद्रराजे भोसले

‘छत्रपती शिवाजी महाराज : द्रष्टे व्यवस्थापक’ कार्यशाळेत इतिहासाच्या व्यापक अभ्यासावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश आपल्या प्रत्येकात आहे. महाराष्ट्रातील आपण सर्वजण त्यांच्या विचारांचे आणि वारशाचे वारसदार आहोत. शिवाजी महाराजांचा परिचित इतिहास आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो; मात्र, त्यापलीकडे असलेला त्यांचा प्रेरणादायी आणि व्यापक इतिहास जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या कार्यशाळेमुळे शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, विचार आणि इतिहास अधिक सखोलपणे समजून घेण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित दोनदिवसीय 'छ्त्रपती शिवाजी महाराज : द्रष्टे व्यवस्थापक' या कार्यशाळेत शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, विश्वस्त राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

भोसले म्हणाले, इराण आणि अमेरिका या दोन राष्ट्रांच्या युद्धात इराणने महासत्ता असलेल्या अमेरिकेला चांगली टक्कर दिली आहे. रशियालाही एकतर्फी युद्ध जिंकता आलेले नसून, मोठे नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, छत्रपतींनी एकाचवेळी तीन लढाया लढणे ही अत्यंत जोखमीची कामगिरी उत्तम पद्धतीने केली. या लढाईसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात आले. या लढाया लढण्यासाठी छत्रपतींनी जनतेवर अधिकचा कर किंवा कोणतीही अतिरिक्त वसुली केली नाही. हे आजच्या काळात शिकण्यासारखे आहे. महाराजांचे आरमार आणि त्याचे व्यवस्थापन कौशल्य हे कमालीचे होते. त्याचाही सखोल अभ्यास व्हायला हवा. महाराजांचे गुण आपण रोजच्या जीवनात आणून, वैभवशाली इतिहास जगायला हवा, असेही भोसले यांनी सांगितले.

डॉ. गोसावी म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन कौशल्य आताच्या लोकांपर्यत पोहोचविणे फार महत्त्वाचे आहे. महाराजांनी गड किल्ले बांधताना भरपूर अभ्यास केला. त्यामुळे हे वैभव आजही टिकून आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लेखन विपुल आहे. पण, त्यांची विविध कौशल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे पांडे यांनी सांगितले.

शिवरायांचे अधिष्ठान, भाषाशुद्धी, अष्टप्रधान मंडळ, मंदिर पुनर्निर्माण, नाणी, कालगणनेसाठी शिव शक अशा प्रत्येक बाबीचा अभ्यास करणे शक्य आहे. महाराजांनी स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म ही त्रिसूत्रीवर आपल्यावर रुजवली असून, त्यावर अधिक काम करायला हवे, असे प्रा. मराठे यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि सदस्य सुनील महाजन यांचा सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT