पुणे : गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आहेत. या गडकिल्ल्यांकडे केवळ पर्यटन स्थळ म्हणून न पाहता त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे. गडकिल्ल्यांच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार्या केंद्रांना 'नमो टुरिझम' हे नाव देण्यात येणार आहे. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम असे नाव द्या, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत केली.
खासदार लंके म्हणाले, गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि मावळ्यांचा इतिहास सांगतात. मात्र, आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा विसर पडला आहे. ज्यांना त्यांच्या नावाने राजकारण करायचे आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे. समाजकारण आणि राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या आदर्शांवरच आपण आज उभे आहोत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणार्या गडकिल्ल्यांची दुरवस्था झाली आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. हे गडकिल्ले किल्ले प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे हे गडकिल्ले आगामी काळात भक्कमपणे उभे राहणे आवश्यक आहे. किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढली गेली पाहिजेत. केंद्राची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक एक दिवस रायगडावर घ्यावी, ज्यामुळे एक नवीन आदर्श उभा राहील, अशी मी संसदेच्या अधिवेशनात मागणी केली होती. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गडकिल्ले स्वच्छता आणि संवंर्धन मोहिमेअंतर्गत २३ नोव्हेंबर रोजी सिंहगडावर स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता गडाच्या पायथ्यापासून या मोहिमेला सुरूवात होणार आहे. १६ मार्च रोजी सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड आणि भुदरगड अशा विविध गडांवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये केवळ स्वच्छता न करता किल्ल्यावरील जीर्ण झालेली मंदिरे, किंवा अन्य दुरावस्थेतील ऐतिहासिक गोष्टींच्या संवंर्धनासाठी केंद्र सरकार आणि पुरातत्व विभागाल पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे काम केले जात असल्याचे लंके यांनी सांगितले.