पुणे : पक्षाचे पदाधिकारी भावनेच्या भरात भाजपसोबत युती तुटली, असे म्हणाले असतील. परंतु, मुंबई-पुण्यासह सर्वच महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी आम्ही एकदिलाने कार्यरत आहोत.
कुठेही महायुती तुटलेली नसून मी अधिकृतपणे याची घोषणा करत आहे' असे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत पुण्यात किती एबी फॉर्म भरले, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसून तीन तारखेला चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
मंगळवारी सकाळी शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी युती तुटल्याचा उच्चार करत सर्व जागा लढवणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनीही महायुती तुटल्याने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्यानंतर विजय शिवतारे यांनी महायुती शाबूत असल्याचे सांगितले. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी वक्तव्याने भाजप शिवसेना युतीबाबत संभ्रम निर्माण झाला असताना सामंत यांनी युती शाबूत असल्याचा पुनरुच्चार केला. याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची हॉटेल रॅमी ग्रँड येथे बैठक सुरू होती. यावेळी बैठकीला सामंत आले असताना त्यांनी ही माहिती दिली.
सामंत म्हणाले, 'पुण्यात महायुतीचे जागावाटप 'सिक्रेट' आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेत अंतिम निर्णय होईल. दरम्यान अर्ज भरण्याची मुदत संपत असल्याने शिवसेनेकडून जिंकणाऱ्या उमेदवारांनाच 'एबी' फॉर्म दिला आहे. राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये महायुती एकजूट असून, काही ठिकाणी एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म दिले आहेत. परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीच्या आत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार समन्वयानेच महायुतीचा निर्णय होणार असून, वेळ कमी असल्याने शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यात आले,' असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सेना-भाजप युती आहे की तुटली याबद्दल संभ्रम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी भाजप १४०, शिवसेना १६ आणि आरपीआय (आठवले गट) नऊ असा महायुतीच्या जागावाटपाचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. तर शिवसेना २५ जागा लढविण्यावर ठाम आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्यापर्यंत सेना-भाजप युती होणार की तुटणार याबद्दल स्पष्टता होणार असल्याचे दिसून येत आहे.
महायुतीचे जागावाटप आणि उमेदवारीवरून शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे आणि शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा होती. त्यावर, शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी पैसे घेऊन तिकीट देणारा नाही. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात अशी विधाने करणे दुर्दैवी आणि खेदजनक आहे. उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकते, परंतु, संबंधितांची समजूत घालण्यात येईल,' असे उदय सामंत यांनी सांगितले.